विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात रात्री आभाळ फाटले. मुसळधार पाऊस पडल्याने रैनी गावातील ऋषिगंगा नदीची पातळी वाढल्याचा आवाज आल्याने रैनी वल्ली, रैनी पल्ली आणि गुजगुसह अन्य गावातील ग्रामस्थ भितीच्या पोटी जंगलाकडे पळाले आणि तेथेच त्यांनी रात्र काढली. Heavy rain in chamoli district
चमोली जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस पडल्याने ८ रस्त्याचे नुकसान झाले तर तीन ठिकाणी पाणी पुरवठा विस्कळीत झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर ऋषिगंगा नदीची पातळी वाढू लागली आणि तपोवन भागात सुरू असलेले एनटीपीसीचा प्रकल्प बंद केला.
रैनी वल्ली, रैनी पल्ली व गुजगुसह अन्य गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा स्तर वाढत असल्याचे पाहून जंगलाचा आश्रय घेतला आणि रात्र उघड्यावर काढली. दुसरीकडे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले की, जिल्हा प्रशासनाला पीडित लोकांची तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
७ फेब्रुवारी रोजी चमोली जिल्ह्यात तपोवन येथे हिमकडे कोसळून झालेली भयंकर दुर्घटना अजूनही गावकरी विसरलेले नाहीत. या घटनेत ५० हून अधिक जणांचे मृतदेह हाती लागले असून दीडशेहून अधिक लोकांचा शोध अद्याप लागलेला नाही.