वृत्तसंस्था
पाटणा: पाटणा येथील एम्समध्ये तीन मुलांना कोव्हॅक्सिनचा लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीच्या चाचणीसाठी हे डोस देण्यात आलेअसून देशात विविध ठिकाणी चाचण्या सुरु झाल्या आहेत. First dose of covacin vaccine to three children at AIIMS in Patna; Start trials in the country
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढत आहे, या पार्श्वभूमीवर देशातील २ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव उत्तम उपाय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली होती. त्यानंतर कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर ट्रायल करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली.
कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर लस चाचणी सुरु आहे. देशातील एकूण ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे.
चाचणीसाठी मुलांचे वय किमान २ वर्षे असायला हवे, असे स्पष्ट करण्यात आले असून, यासाठी पाटणा येथील एम्समध्ये लहान मुलांवर ट्रायल करण्यास सुरुवात झाली आहे. पाटणा येथील एम्समध्ये डोस घेण्यासाठी एकूण १५ मुले आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड करण्यात आली होती.
त्याआधी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी केली. त्यात ३ मुले चाचणीसाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस दिला. पहिला डोस दिल्यानंतर या मुलांना जवळपास २ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
पहिला डोस घेतलेल्या मुलांवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. आता दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जात आहे.