दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींवर रासुका लावण्यात आला आहे. यामध्ये अन्सार, सलीम, सोनू, दिलशाद, अहिर यांचा समावेश आहे. येथे हिंसाचारासाठी शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी गुलाम रसूल ऊर्फ गुल्लीलाही मंगळवारी अटक करण्यात आली आहे.Delhi Violence 5 accused in Jahangirpuri riots Rasuka, connection of banned organization PFI also investigated
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींवर रासुका लावण्यात आला आहे. यामध्ये अन्सार, सलीम, सोनू, दिलशाद, अहिर यांचा समावेश आहे. येथे हिंसाचारासाठी शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी गुलाम रसूल ऊर्फ गुल्लीलाही मंगळवारी अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता या दंगलीत बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेच्या सहभागाचीही चौकशी केली जाणार आहे.
विशेष पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांनी मंगळवारी सांगितले की, हिंसाचाराच्या वेळी व्हिडिओमध्ये शस्त्रांसह दिसणाऱ्या सर्वांना अटक करण्यात आली आहे. पीएफआयच्या अँगलनेही तपास केला जात आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, सध्या तपासाबाबत माहिती देणे योग्य नाही.
अमित शहा म्हणाले – दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये आणि लोकांसमोर आदर्श निर्माण व्हावा, यासाठी याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे, असे शहा म्हणाले. गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना बोलावून याप्रकरणी जी काही आवश्यक पावले उचलायला पाहिजेत ती उचलावीत, असे सांगितले.
एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक करण्यात आली
दिल्ली पोलिसांनी मंगळवारीच 5 जणांना अटक केली आहे. ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत. यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी सोनू चिकना ऊर्फ इमाम ऊर्फ युनूस याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोनूने सांगितले की, हनुमान जयंतीच्या दिवशी कुशल चौकाजवळ मी गोळीबार केला होता. पोलिसांनी सोनूच्या ताब्यातून एक पिस्तूलही जप्त केले आहे.