वृत्तसंस्था
चेन्नई – माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान करणारे डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात तामिळनाडू भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आणि ही तक्रार फक्त त्यांना डीएमकेच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून हटविण्याची नाही, तर त्यांची विधानसभा निवडणूकीतली डीएमकेची उमेदवारीच रद्द करण्याची आहे. BJP files complaint with EC demanding disqualification of Udhayanidhi Stalin’s candidature
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छळ केल्यामुळेच अरूण जेटली आणि सुषमा स्वराज या केंद्रीय मंत्र्यांचा मृत्यू झाला. मोदी ज्येष्ठ नेत्यांना कधीही मान देत नाहीत. त्यांनी एम. वेंकय्या नायडू यांनाही बाजूलाच सारले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले होते. त्या वक्तव्यावरूनच भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
उदयनिधी हे चेपॉक – तिरूवल्लीकेनी मतदारसंघातून डीएमकेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. ते एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री कलैग्नार करूणानिधींचे नातू आहेत. स्वतः स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन हे दोघेही निवडणूक मैदानात आल्याने पंतप्रधान मोदींनी डीएमकेला फॅमिली पार्टी म्हणून टार्गेट केले आहे.
मोदींच्या या टीकेलाच उत्तर देताना उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ घसरली आणि त्यांनी अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या मृत्यूसाठी मोदींना जबाबदार धरणारे बेछूट वक्तव्य केले. ते आता अंगलट येण्याची शक्यता आहे.
ए. राजांवर प्रचारबंदीची कारवाई
याआधी डीएमकेचे नेते टूजी घोटाळा फेम मंत्री ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामींना त्यांच्या आई – वडिलांवरून टार्गेट केले होते. निवडणूक आयोगाने राजांवर कायदेशीर कारवाई करून ४८ तासांची प्रचारबंदी घातली आहे.
मुरासोली मारन यांचे चिरंजीव दयानिधी मारन यांनीही असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले होते, की “मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची जयललिता मम्मी आणि नरेंद्र मोदी डॅडी आहेत.” त्यावर अण्णाद्रमूकने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तिचा निकाल अपेक्षित आहे.
यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल करून डीएमकेला अडचणीत आणले आहे.