विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक जाहीर करताना कोरोना प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 15 जानेवारी पर्यंत प्रचारसभा, रॅली, मेळावे यांना बंदी घातली. मात्र डिजिटल प्रचाराला मुभा दिली आहे. त्याविरोधात समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी जोरदार आवाज उठवला आहे. डिजिटल प्रचारात भाजपची बरोबरी कोणी करू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी असल्याची टीका त्यांनी केली आहे. Although there are no campaign rallies in Uttar Pradesh at present …; Even if Akhilesh complains … read what someone did … !!
या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचाराचा नेमका आढावा घेतला असता काही बाबी स्पष्ट होतात. अखिलेश यादव यांची तक्रार अगदीच खोटी नाही असे मानले तरी देखील गेल्या 5 महिन्यांपासून सर्वच पक्षांनी त्यामध्ये सत्ताधारी भाजप, विरोधी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस यांनी आपापल्या पातळ्यांवर उत्तर प्रदेशात मोठ्या रॅली, पक्षांचे मेळावे यांचा धडाका लावला होता, असे दिसून आले आहे.
भाजपचा प्रचार
उदाहरणच द्यायचे झाले, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुमारे 250 मतदारसंघाचा दौरा गेल्या सहा महिन्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी केला आहे. 150 हून अधिक मतदारसंघांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या प्रकल्पांची उद्घाटने केली आहेत. यापैकी 78 मतदारसंघांमध्ये भाजप 2017 च्या निवडणुकीत पराभूत झाला होता. याचा अर्थ भाजपने या 78 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशातल्या 20 शहरांमध्ये मोठ्या जाहीर सभा झाल्या आहेत. सुमारे 1 लाख कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन अथवा शिलान्यास पंतप्रधान मोदींनी गेल्या 5 महिन्यात महिन्यांमध्ये केला आहे. त्यामुळे भाजपला तरी प्रचाराला वेळ मिळालेला नसल्याची तक्रार करता येत नाही.
समाजवादी विजय यात्रा
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी समाजवादी विजय यात्रा सुमारे 130 मतदारसंघांमधून नेली. ती यात्रा पूर्ण झाली आहे. या खेरीज समाजवादी पक्षाची सोहेलदेव समाज पक्षाशी युती झाली आहे. या युतीचे उत्तर प्रदेशातल्या 7 मोठ्या शहरांमध्ये मेळावे झाले आहेत. त्याच बरोबर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाशी समाजवादी पक्षाची युती झाली आहे. त्यांचे मेरठसह 5 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे झाले आहेत. या खेरीज अखिलेश यादव यांनी ब्राह्मण समाजाचे 18 मेळावे घेतले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा ब्राह्मण दलित फार्म्युला मोडून काढण्यासाठी अखिलेश यादव यांनी ब्राह्मण समाजाच्या अनेक नेत्यांना समाजवादी पक्षाच्या गळाला लावले आहे. यांनी उत्तर प्रदेशातल्या 49 जिल्ह्यांमध्ये भगवान परशुरामांचे भव्य पुतळे उभे केले आहेत. त्याची उद्घाटने अखिलेश यादव यांनी केली आहेत.
मायावतींची ब्राह्मण महासंमेलने
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी देखील महिनाभरापूर्वी पर्यंत उत्तर प्रदेशातल्या विविध जिल्ह्यांमध्ये ब्राह्मण आणि दलित समाज यांचे मेळावे घेतले आहेत. ही महासंमेलने बहुजन समाज पक्षाच्या प्रचारासाठी उपयोगी ठरली आहेत.
प्रियांका गांधींचा प्रचार
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गेल्या 5 महिन्यांपासून उत्तर प्रदेशात 19 महामेळावे घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गोरखपुरमध्ये घेतलेला महामेळावा प्रचंड गाजला आहे. याखेरीज प्रियंका गांधी यांनी राज्यामध्ये “लडकी हूं लढ सकती हूं” हा उपक्रम गाजवला आहे. किंबहुना त्यांचा भर हा उत्तर प्रदेशातील तरुण महिला मतदार टार्गेट करण्यावर राहिला आहे.
विधानसभेची निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वी तसेच कोरोनामुळे निर्बंध लागू होण्यापूर्वी या सर्व नेत्यांच्या प्रचाराची मोहीम आपापल्या पद्धतीने पुढे सरकली होती. कोरोना निर्बंध लागू शकतात याची पूर्वकल्पना या सर्व नेत्यांना होतीच.
या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होईपर्यंत या सर्व नेत्यांनी राज्याचा एक दौरा तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पूर्ण केला आहे हेच यातून दिसून येते. त्यामुळे अखिलेश यादव किंवा अन्य विरोधी पक्षांनी कितीही टीका केली आणि प्रचाराला वेळ कमी मिळत असल्याचे म्हटले असले तरी वस्तुस्थिती मात्र सर्व पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराचा धडाका लावला होता ही वस्तुस्थिती आहे.