वृत्तसंस्था
टोकियो : भारताचा मल्ल बजरंग पुनियाने आज कमालीचा खेळ करून कझाकस्तानचा मल्ल दौलत नियाज बेकोव्ह याला 8 – 0 ने हरवून भारतासाठी ब्राँझ पदक मिळवले आणि “बजरंग” हे नाव सार्थ केले.| Wrestler Bajrang Punia wins #Bronze medal in Men’s Freestyle 65kg against Kazakhstan’s Daulet Niyazbekov, 8-0
बजरंगच्या विजयाने संपूर्ण देशात आनंदाची लहर पसरली असून त्याने ज्या पद्धतीने अत्यंत आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्धी मल्लाला 8 – 0 अशा जबरदस्त फरकाने हरविले हे पाहून त्याचे वडील बलवान सिंग दुनिया यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे माझ्यासाठी ब्राँझ पदक नसून सुवर्ण पदकच आहे, अशी प्रतिक्रिया बलवान सिंग पुनिया यांनी व्यक्त केली.
देशभरातून बजरंग पूनियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून त्याने मिळवलेले अभूतपूर्व यश भारताच्या क्रीडा क्षेत्रात कायमचे लक्षात राहील, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे. 8 – 0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. बजरंगने ही कमाल केली आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
“ही बजरंगाची कमाल आहे”, अशा भावना भारतातल्या असंख्य नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. भारताच्या कुस्ती क्षेत्रात एक आघाडीचे पाऊल यानिमित्ताने पडले आहे. भारतीय मल्लांची आंतरराष्ट्रीय कीर्ती यामुळे वाढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.