वृत्तसंस्था
वॉशिंग्टन – कोविड संकटात भारताने दिलेली साथ अमेरिका कधीच विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी केले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोविड संकटात अमेरिका भारताच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही देखील ब्लिंकेन यांनी दिली. Will Never Forget US State Secretary On India’s Help During Covid
कोविड संकटाला अमेरिका आणि भारत एकत्रितरित्या तोंड देतील, असे सांगून ब्लिंकेन म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने अमेरिकेला जी मदत केली आहे, ती अमेरिका कधीही विसरू शकणार नाही. भारताच्या विद्यमान कोविड संकटात अमेरिका भारताच्या पाठीशी ठाम उभी राहील. दोन्ही देशांची सहकारीता आणि सहभागीदारी मजबूत आहे. कोविड संकटात विविध देवघेवींच्या रूपात ती अधिक मजबूत होईल, असा विश्वास ब्लिंकेन यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याशी संरक्षणविषयक बाबींवर व्यापक चर्चा केली. कोविड संकटकाळातही भारताच्या सुरक्षाविषयक चिंता कमी झालेल्या नाहीत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारत – अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणखी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, असे लॉयड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले.
लस उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पुरविण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सविस्तर वाटाघाटी सुरू आहेत. त्यातून भारताला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. क्वाड सदस्य देशांशी देखील याच विषयासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. सर्व देशांशी असलेल्या सप्लाय चेन अधिक मजबूत करण्यावर चर्चा होत आहेत. त्या लवकर पूर्ण होऊन भारताला कोविड प्रतिबंधक लसीच्या कच्च्या मालाचा पुरवठा लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली.
Will Never Forget US State Secretary On India’s Help During Covid