विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवालांना जामीन दिला, पण त्यांच्या राजकीय नाड्या पूर्ण आवळल्या. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्याची घोषणा करावी लागली, पण केजरीवालांनी नुसती राजीनाम्याची घोषणा केली, तर ताबडतोब आम आदमी पार्टीतल्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलल्या. दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी चढाओढ सुरू झाली. पण भाजपच्या नेत्यांनी केजरीवालांची घोषणा पुरती “एक्सपोज” केली. सुनिता केजरीवालांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी अरविंद केजरीवालांनी थेट राजीनामा न देता घोषणा करून दोन दिवसांची मुदत वाढवून घेतली असे भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितले. Kejriwal
तसेही सुनीता केजरीवाल यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीत आघाडीवर आहे. कारण आम आदमी पार्टीत राहायचे, तर अरविंद केजरीवालांची मर्जी सांभाळावी लागेल, याची जाणीव प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला आहे. केजरीवालांनी आपल्या राजीनामाची घोषणा करताना आणखी एक मेख मारून ठेवली.
आपण तर राजीनामा देऊच, पण लोकांनी सांगितल्याशिवाय आपण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. त्याचबरोबर मनीष सिसोदिया देखील कुठली पद स्वीकारणार नाहीत, अशी घोषणा करून केजरीवालांनी सिसोदिया यांचे पंख कापून टाकले. त्यांनी आपल्या मार्गातला मुख्य काटा परस्पर दूर करून टाकला. कारण केजरीवाल यांच्या नंतर जेष्ठतेच्या निकषावर मनीष सिसोदिया मुख्यमंत्री पदावर बसले असते, तर ते केजरीवालांच्या सोयीनुसार नंतर त्या पदावरून उतरलेच असते, याची कुठलीही केजरीवालांना गॅरंटी नसल्याने त्यांनी सिसोदियांचे पंख कापून टाकल्याचे बोलले जात आहे.
पण त्यामुळे अन्य नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलून वर आल्या. आम आदमी पार्टीत केजरीवाल यांच्यानंतर राखी बिर्ला, अतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज आणि कैलाश गेहलोत या मंत्र्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी घेतली जात आहेत. यापैकी कोणीही उघडपणे महत्त्वाकांक्षा जाहीर केलेली नाही. पण माध्यमांनी मात्र त्यांचीच नावे बातम्यांमध्ये चालविली आहेत.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीत मुख्यमंत्रीपदासाठी संघर्ष झाला, तर अरविंद केजरीवाल सुनीता केजरीवारांचे नाव इतरांमार्फत पुढे करून त्यांना खुर्चीवर बसवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा संघर्ष तीव्र झाला, तर मात्र राजीनामा देण्याचा निर्णय रद्द करून तेच पुन्हा खुर्चीला चिकटून राहण्याची देखील दाट शक्यता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बंद दाराआड बोलून दाखवली जात आहे. Kejriwal