वृत्तसंस्था
बंगळुरू : Bangalore पत्नीशी जोरदार भांडण झाल्यानंतर तिचा खून करून मृतदेह बंगळुरूहून कारने मुंबईला नेताना टेक इंजिनिअर पती राकेश राजेंद्र खेडकर (३५) याला सातारा जिल्ह्यात शिरवळ येथे अटक करण्यात आली. पत्नीचा खून केल्यामुळे तणावात असलेल्या राकेशने महाराष्ट्रात कागल गावात आल्यानंतर कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्याला त्रास सुरू झाल्याने तो कारमधून बाहेर येत रस्त्यात येऊन बसला. एका दुकानदाराने त्याची विचारपूस करून रुग्णालयात दाखल केले. तिथे नेमके शिरवळ पोलिस ठाण्याचा कर्मचाऱ्याने त्याची चौकशी केल्यावर राकेशने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तिथेच जेरबंद करण्यात आले.Bangalore
राकेश (मूळ जोगेश्वरी, मुंबई) हा एका कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून वर्क फ्रॉम होम काम करतो. पत्नी गौरीसह बंगळुरूत बनारगट्टा येथे तेजस्विनीनगरात राहत होता.
पत्नी गौरीने नोकरी सोडली होती. २६ मार्च रोजी दांपत्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. नोकरी नसल्याने गौरीने मुंबईला परतण्याचा आग्रह धरला होता. परंतु रूमचे डिपॉझिट भरले असल्याने आताच रूम सोडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, असे राकेशचे म्हणणे होते. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला अखेर पत्नी गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन तिच्या मान, गळा आणि पाठीवर चाकूने वार केले. यातच गौरीचा जीव गेला.
मृतदेह बॅगमध्ये भरून
घराच्या लॉबीत निपचित पडलेल्या गौरीचा मृतदेह राकेशने एका मोठ्या बॅगमध्ये भरला. चेन लावून ती बॅग बाथरूमबाहेर नेऊन ठेवली. गुरुवार, २७ मार्च रोजी रात्री १२ वाजता राकेश आपले साहित्य सोबत घेऊन होंडा सिटी कारने बंगळुरूहून जोगेश्वरीकडे (मुंबई) निघाला. पत्नीचा खून केल्यामुळे राकेशला प्रचंड तणावात होता. त्याने महाराष्ट्रात कागल या गावी आल्यावर एका मेडिकल दुकानांमधून फिनाइल व झुरळ मारण्याचे औषध घेऊन कोल्हापूर, कराडच्या दिशेने प्रवास केला.
असा आला खून उघडकीस
खंडाळा घाट उतरल्यावर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळील महामार्गावर राकेश कार घेऊन आला. खुनाचा तणाव असह्य झाल्याने त्याने सर्व कीटकनाशके एकत्र करून पिऊन घेतले. पण त्याचा त्रास सुरू झाल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. त्याला पाहून एका मोटरसायकलस्वाराने त्याची विचारपूस केली. त्या वेळी आपण फिनाइल प्यायल्याचे सांगितल्याने दुचाकीस्वाराने त्याला तात्काळ त्याच्या कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्या ठिकाणी अगोदरच हजर असलेले शिरवळ पोलिस ठाण्याचे हवालदार कुंभार यांनी राकेशकडे काय झाले याबाबत विचारणा केली असता राकेशने त्याच्या पत्नीच्या खुनाबाबतचा प्रकार सांगितला.
राकेशला हलवले पुण्यात
कीटकनाशक प्यायल्याने अधिक उपचाराची गरज असल्याने राकेशला तत्काळ पुण्यात हलवण्यात आले. आधी भारती विद्यापीठ रुग्णालय व नंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बंगळुरू येथील संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी शुक्रवारी पहाटे ससून हॉस्पिटल येथे पोहोचले होते.
रात्रभर मृतदेहाजवळ बसून विचारत होता, माझा दोष काय ?
पत्नीची हत्या केल्यानंतर रात्रभर राकेश मृतदेहाजवळ बसून होता. नोकरी तू सोडलीस, मग मला दोष का देतेस, असे विचारत बसला होता. बंगळुरूहून निघाल्यानंतर त्याने आपल्या घरमालकाला फोन करून पत्नीने आत्महत्या केल्याचे खोटेच सांगितले. त्यानंतर त्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.