विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भय बिनु होइ न प्रीति.. रामचरितमानस मधील ही चौपाई म्हणजे एक संदेश. प्रेम हवे असेल तर भीती आवश्यक आहे. जो नम्रतेला प्रतिसाद देत नाही, त्याला ताकद दाखवावीच लागते, असे सांगत एअर मार्शल ए. के. भारती यांनी पाकिस्तानला इशाराच दिला.
राजधानी दिल्लीत भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही दलांच्या महासंचालकांनी (DGMO) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संरक्षण विषयावर होत असलेल्या या गंभीर संवादाचा उद्देश देशवासीयांना ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल माहिती देणे आणि शत्रूला स्पष्ट संदेश देणे होता. पण या पत्रकार परिषदेत एक असा क्षण आला की, संपूर्ण राष्ट्राच्या मनात अभिमानासोबत एक ऊर्जा निर्माण झाली.
‘न्यूज नेशन’चे पत्रकार मधुरेन्द्र यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारलेला पहिला प्रश्न जणू संपूर्ण संवादाचा सूर बदलणारा ठरला. त्यांनी विचारले की कालच्या पत्रकार परिषदेस सुरुवात करताना ‘शिवतांडव स्तोत्र’ पार्श्वसंगीतात वापरण्यात आले होते. आज ‘रश्मिरथी’मधील ‘कृष्ण की चेतावनी’च्या ओळी सांगण्यात आल्या. या माध्यमातून शत्रूस आपण काय सांगू इच्छिता?” असा त्यांचा थेट, पण सुसंस्कृत प्रश्न होता.
एअर मार्शल ए. के. भारती यांना हा प्रश्न इतका भावला की त्यांनी स्वतः पत्रकाराचे नाव आणि संस्थेचे नाव विचारले.
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘रश्मिरथी’ या महाकाव्यातील कृष्ण की चेतावनी’च्या ओळीचा संदर्भ देत ते म्हणाले, कृष्ण की चेतावनी भागातील या ओळीत श्रीकृष्ण दुर्योधनासमोर उभे राहून त्याच्या अहंकारावर प्रहार करतात.
“जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है…”
या ओळींमधून दुर्योधनाचे आत्मघातकी वर्तन दाखवले आहे. जेव्हा विनाश जवळ येतो, तेव्हा माणसाचा विवेक आधी मरतो. श्रीकृष्ण त्याच्या विराट रूपात प्रकट होतात आणि दुर्योधनाला खुले आव्हान देतात. हा फक्त साहित्यिक संवाद नव्हता. ते एक धोरणात्मक विधान होतं .भारताच्या संयमाला कमकुवतपणाचे लक्षण समजू नये. जर शत्रू दुर्योधनासारखी चूक करत असेल, तर उत्तरही कृष्णाच्या विराट रूपासारखंच मिळेल.
या पार्श्वभूमीवर भारतींनी उत्तर दिलं कोणतीही टिपणी किंवा लांबलचक स्पष्टीकरण न देता, त्यांनी रामचरितमानसमधील एक ठाम चौपाई उच्चारली:
“बिनय न मानत जलधि जड़
गए तीनि दिन बीति।
बोले राम सकोप तब
भय बिनु होइ न प्रीति॥”
याचा अर्थ असा की, श्रीरामाने समुद्राला विनवले, पण प्रतिसाद न मिळाल्याने रागावले. प्रभू राम म्हणाले जर नम्रतेला प्रतिसाद नसेल, तर प्रेमही निर्माण होत नाही. ही चौपाई सांगत भारतींनी स्पष्ट संदेश दिला — भारताने शांतीचा, संवादाचा मार्ग शोधला, पण जर शत्रूने त्याकडे दुर्लक्ष केले, तर भारत कधीही आपले शौर्य दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही.
लष्करी पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांकडून टाळ्या वाजवणं हे अत्यंत दुर्मिळ दृश्य असतं. पण एअर मार्शल भारतींनी उच्चारलेले शब्द ऐकून संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. त्यांच्या शेजारी बसलेले नौदलाचे व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनीही सौम्य हास्य करत त्यांच्या उत्तराला मौन समर्थन दिलं.
या एका चौपाईने भारतींनी सैनिकी पराक्रमासोबत भारतीय सांस्कृतिक वारशाचेही दर्शन घडवले. त्यांनी दाखवलेली तीव्र भावना, तीव्रता, आणि भावनात्मक हुंकार केवळ शब्द नव्हते ते भारताचे धोरण होते
परिषद संपवताना अॅडमिरल प्रमोद यांनी अत्यंत अर्थपूर्ण वेद मंत्र उच्चारला, शं नो वरुणः’ याचा अर्थ म्हणजे समुद्र देवता, वरुण आमच्यावर कृपादृष्टी ठेवो.
हा मंत्र म्हणजे संयमाचा, शांतीचा आणि आशीर्वादाचा मागणी करणारा स्तोत्र. पण तो उच्चारताना जणू भारताने जगाला सांगितले — “आम्ही युद्ध नको म्हणतो, पण जर गरज पडली, तर ‘राम’ आणि ‘कृष्णा’चा विचार आम्ही विसरलेलो नाही.