नाशिक : संसदेमध्ये मोदी सरकार मांडणार असलेल्या Waqf board सुधारणा विधेयकाच्या बाजूने उभे राहून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व सिद्ध करायची संधी आली आहे, पण त्या पलीकडे जाऊन ते जर चतुर असतील, तर पुढची राजकीय पेरणी करायची देखील त्यापेक्षा मोठी संधी त्यांना उपलब्ध झाली आहे.
लोकसभा आणि राज्यसभेतले एकूण संख्याबळ लक्षात घेता, भाजपने आपल्या सगळ्या खासदारांना व्हीप काढून तिथे हजर राहण्याची सूचना केली आहेच, त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांनी देखील आपल्या तीन सुधारणा केंद्र सरकारने मंजूर केल्याबरोबर आपल्या १६ खासदारांना waqf board सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करायचा आदेश काढला आहे. भाजप + चंद्राबाबू नायडू + नीतीश कुमार + एकनाथ शिंदे + चिराग पासवान अशी सगळी मजबूत फळी घेऊन लोकसभेत आणि राज्यसभेत waqf board सुधारणा विधेयकाच्या मतदानाला सामोरे जाताना सरकारने चांगली बांधबंधिस्ती केली आहे.
त्यामुळे भाजपला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या १० खासदारांची गरज भासेलच असे बिलकुल नाही, पण तरी देखील उद्धव ठाकरे यांना waqf board सुधारणा विधेयकाच्या बाजूने १० खासदारांचे मतदान घडवून शिवसेनेचे हिंदुत्व सिद्ध करायची संधी आली आहे. एकदा त्यांनी तसे केले, की आपोआपच ते काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या कचाट्यातून बाहेर पडतील आणि महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत स्वबळाचा मार्ग मोकळा होईल.
पण त्या पलीकडे जाऊन महायुतीमध्ये अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे आणि काही प्रमाणात अजित पवार यांच्यात राजकीय अस्वस्थता निर्माण करायची ही संधी आहे. उद्धव ठाकरेंनी waqf board सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, की इकडे महाराष्ट्रात महायुतीत एकनाथ शिंदेंची पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू आपोआप घटेल. उद्धव ठाकरेंची – मोदी आणि शाह यांच्याशी परस्पर जवळीक निर्माण होऊ शकेल. महाराष्ट्रात गंभीर मतभेद असले तरी राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर आम्ही मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतो, असा राजकीय संदेश देऊन उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वतःची प्रतिमा निर्मिती करू शकतील. त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा वरचष्मा निर्माण होऊ शकेल. याचा फायदा अगदी तातडीने होईलच असे नाही पण, एकनाथ शिंदे यांची न्यूसन्स व्हॅल्यू कमी झाली तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला स्वतःच्या पुनर्जीवनाची मोठी संधी त्यातून उपलब्ध होईल. ही दीर्घकाळाची राजकीय पेरणी ठरू शकेल, पण त्या पलीकडे जाऊन आदित्य ठाकरे यांच्या भोवतीचे चौकशी आणि तपासाचे जाळे काहीसे ढिले होईल. कारण मूळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जाळ्यात तशा आधीच फटी निर्माण करून ठेवल्याचे भाऊ तोरसेकरांचे विश्वसनीय म्हणणे आहे.