विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Waqf बोर्ड सुधारणा विधेयक कोणत्याही स्थितीत संसदेच्या विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करून घ्यायची जय्यत तयारी केंद्राच्या मोदी सरकारने केली असून त्यादृष्टीने भाजपच्या सर्व खासदारांना पक्षाने व्हीप जारी केला.
मोदी सरकार उद्या लोकसभेत आणि परवा राज्यसभेत सुधारणा विधेयक मांडणार आहे. उद्या लोकसभेतील नियोजनानुसार संबंधित विधेयक मांडल्यानंतर आठ तासांची चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर परवा राज्यसभेत हे विधेयक मांडून तिथे देखील विशिष्ट तासांच्या चर्चेनंतर ते विधेयक मंजूर करून घेण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे. म्हणूनच 2 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत सर्व खासदारांनी हजर राहावे, असा व्हीप भाजपने जारी केला असून ३ एप्रिल 2025 रोजी राज्यसभेतील खासदारांना तो लागू केला आहे.
Waqf board सुधारणा विधेयक हा भाजपच्या सरकारच्या टॉपचा अजेंडा असल्याने कोणत्या स्थितीत संसदेच्या दोन्ही सभागृहात खासदार संख्या कमी पडता कामा नये या दृष्टीने भाजपने काळजी घेतली आहे. भाजप बरोबरच एनडीएचे म्हणजेच सत्ताधारी आघाडीतील सर्व खासदार देखील लोकसभा आणि राज्यसभेत हजर ठेवण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी केली आहे.