वृत्तसंस्था
उन्नाव – …याला म्हणतात, निवडणूक आचारसंहितेचे पालन… २०० किलो जिलेबी, १०५० सामोसे यूपीतल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जप्त… होय बातमी खरी आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात हे घडले आहे. Unnao Police seized 2 quintal jalebi & 1050 samosa cooked for distribution among voters by a gram panchayat poll candidate in Hasanganj
एकीकडे बंगालमध्ये निवडणूक हिंसाचार उफाळतोय… ५ जणांचा बळी गेलाय. दगडफेक, मारामाऱ्या नित्याच्या बातम्यांचे विषय झालेत. त्याच्या बातम्याही सामान्य लोकांसाठी रटाळ झाल्यात… पण त्याचवेळी उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील हासनगंज गावातून गोड – चटकदार – चविष्ट बातमी आली आहे. बातमीतले पदार्थ गोड आणि चटकदार आहेत… पण ते लोकांच्या तोंडी लागलेले नाहीत.
तिथल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आदर्श आचार संहितेचे पालन करीत पोलीसांनी एका उमेदवाराने मतदारांना वाटायला केलेली २०० किलो जिलेबी आणि १०५० सामोसे जप्त केलेत… योगींच्या पोलीसांनी… लोकांच्या तोंडात जिलेबी आणि सामोसे पडू दिले नाहीत. संबंधित उमेदवाराने आपल्या घराजवळच आचारी बोलवून चुली घालून जिलब्या आणि सामोसे तळून घेतले होते.
पोलीसांनी त्या आचाऱ्यांचे सामान आणि दोन्ही पदार्थ जप्त केले आणि १० जणांना अटक केली. उमेदवाराविरोधात आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याचबरोबर कोविड नियमावली तोडल्याचा गुन्हाही त्याच्यात जोडून टाकला. पण पोलीसांनी जप्त केलेल्या २०० किलो जिलबीचे आणि १०५० सामोशांचे नंतर नेमके काय केले हे मात्र समजले नाही.