विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज येणे सुरू झाले यापैकी एबीपी – सी वोटरने केलेल्या एक्झिट पोल नुसार महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यावर मात करून आपला अव्वल नंबर कायम ठेवला आहे. Uddhav thackeray remained boss in MVA, but will he remain in MVA a million dollar question
पण देशातले एकूण वातावरण मोदी सरकारला अनुकूल असून मोदी सरकार पूर्ण बहुमत येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडी 359 जागा मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे 4 जून नंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडवून उद्धव ठाकरे आपल्या नवनिर्वाचित 9 खासदारांसह महाविकास आघाडीत टिकून राहतीलच का??, याविषयी दाट शंका निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीला राज्यात 23 ते 25 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज
आहे.
महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 21 जागा लढविल्या होत्या. त्यांना 9 जागा मिळतील, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राज्यात 17 जागा लवढल्या होत्या. त्यापैकी 8 जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे आणि काँग्रेस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकावर ढकलून त्यांच्या वाट्याला फक्त 10 जागा दिले होत्या. त्यापैकी शरद पवारांचा पक्ष सहा जागी त्यांचे खासदार निवडून आणू शकेल. त्यामुळे पवारांच्या पक्षाचे स्थान महाविकास आघाडी तिसऱ्या नंबरचेच राहणार आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील हे बाजी मारतील असा अंदाज सांगतोय.
उद्धव ठाकरेंना 9 जागांचा तोटा
गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले होते. शिवसेना फुटल्यानंतर त्यापैकी 13 खासदार हे त्यांना सोडून गेले, तर 5 खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले. यंदा उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेत उद्धव ठाकरेंना 9 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे.
गतवेळच्या तुलनेत यंदा काँग्रेसला सात जागांचा अधिकचा फायदा होणार असल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. त्या तुलनेत यंदा 8 खासदार निवडून येतील असं सी व्होटरचा सर्व्हे सांगतोय. त्यामुळे यंदा काँग्रेसला सात खासदारांचा फायदा होतोय असं दिसतंय.
भाजपला 6 जागांचा तोटा
2019 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या 23 जागा निवडून आल्या होत्या. त्यांना आता 6 जागांचा तोटा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपने 28 जागा लढवल्या असून त्यांना 17 जागा मिळणार असल्याचा अंदाज सांगतोय.