स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अज्ञात पैलूंना उजाळा मिळतो आहे. अनेक ज्ञात, अज्ञात क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना देशात आणि परदेशात असलेला भारतीय समाज मानवंदना देतो आहे. ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे!!Tilak Swarajya Fund; Modern India’s First CSR Fund; Who removed it?? Who contributed
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आर्थिक इतिहास समग्रपणे अद्याप मांडायचा आहे. कोणतीही गोष्ट अथवा लढा त्याच्या आर्थिक पैलू शिवाय पूर्ण होत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तसेच आहे. असंख्य ज्ञात – अज्ञात हातांनी भारतीय स्वातंत्र्य लढायला सढळ हाताने मदत केल्याचे आढळते.
महात्मा गांधींचा टिळक स्वराज्य फंड
यातला सर्वात प्रथम प्रयत्न महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांच्या नावाने केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. किंबहुना हा आधुनिक भारतातला सर्वात पहिला “सीआरएस फंड” आहे. लोकमान्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहतानाच महात्मा गांधी यांनी टिळक स्वराज्य फंडाची संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला अखंड हिंदुस्थानातल्या सर्व क्षेत्रातल्या धूरिणांनी उचलून धरले. किंबहुना त्यामध्ये आपले योगदान दिले. यातला सर्वाधिक बोलबाला महाराष्ट्रात तरी बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या संयुक्त मानापमानाच्या प्रयोगाच्या उत्पन्नाचा झाला. 1921 सालचे तब्बल 19000 रुपयांचे उत्पन्न या दोन्ही उत्तुंग नटवर्यांनी महात्मा गांधींच्या टिळक स्वराज्य खंडाला बहाल केले होते. पण महात्मा गांधींचा संकल्प तब्बल 1 कोटी रुपयांचा टिळक स्वराज्य फंड जमवण्याचा होता. यातून स्वदेशी आणि दारूबंदी यांच्यासारख्या मोहिमांना त्यांना आर्थिक बळ द्यायचे होते. गांधीजींनी समस्त भारतीयांच्या मदतीने आपला संकल्प पूर्ण केला देखील!!
टिळक स्वराज्य फंडाची आकडेवारी
टिळक स्वराज्य फंडाची आकडेवारी लोकमान्यच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकेकाळी साने गुरुजी यांचे शिक्षक असलेले परंतु नंतर हिंदुस्थानातल्या थोर नेत्यांचे चरित्रकार म्हणून गाजलेले डी. व्ही. आठल्ये यांनी 1921 मध्येच लोकमान्य टिळक यांचे इंग्रजी चरित्र लिहिले आहे. या चरित्राला देशबंधू बॅरिस्टर चित्तरंजन दास यांची प्रस्तावना आहे. या चरित्रात महात्मा गांधींच्या टिळक स्वराज्य फंडाची आणि त्याच्या योगदान कर्त्यांची यादीच आठल्ये यांनी दिली आहे.
सर्वाधिक 3 लाखांचे योगदान गोदरेज यांचे
टिळक स्वराज्य फंडा करता सर्वाधिक 300000 चे योगदान त्यावेळचे प्रख्यात उद्योगपती आणि लोकमान्य यांचे स्नेही ए. बी. गोदरेज यांनी दिल्याचे नोंद आठल्ये यांनी केली आहे. लोकमान्यांच्या निधनाच्या वेळी हिंदुस्थान अखंड होता. त्यामुळे हिंदुस्थानातल्या सर्व प्रांतामधून टिळक स्वराज्य फंडासाठी मोठमोठ्या रकमा आल्याच्या नोंदी या यादीत आहेत. त्या वेळच्या मुंबई प्रांतापासून ते उत्कल प्रांतापर्यंत म्हणजे आजच्या ओरिसापर्यंत सर्व प्रांतांमधून आपापल्या कुवतीनुसार टिळक स्वराज्य फंडाला निधी आला आहे. यामध्ये अर्थातच सर्वाधिक मोठा वाटा हा तत्कालीन बॉम्बेचा म्हणजे मुंबईचा होता. टिळक स्वराज्य फंडाकरता तब्बल 37 लाख 50 हजार रुपयांची निधी एकट्या मुंबईतून जमा झाला होता. त्या खालोखाल गुजरात मधून 15 लाख, तर अखंड पंजाब प्रांतातून 9 लाख 22 हजार 707 रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडाला मिळाला. 21,038 रुपयांचा निधी केरळ प्रांतातून मिळाला होता. ही त्यावेळची सर्वात कमी रक्कम होती. परंतु अखंड हिंदुस्थानातला एकही प्रांत असा नव्हता की की ज्या प्रांतातून टिळक स्वराज्य फंडाला मदत आली नव्हती. मराठी मध्य प्रांतापेक्षा अधिक निधी तत्कालीन सिंध प्रांताने दिला होता. तो 1 लाख 95 हजार 542 रुपयांचा होता. टिळकांच्या 6 वर्षांच्या मंडालेतील शिक्षेमुळे मुळे संपूर्ण हिंदुस्थानात प्रसिद्ध झालेल्या ब्रह्मदेशातून तब्बल 1.25 लाख रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडाला मिळाला होता.
गांधीजी, मालवीय, नेहरू विश्वस्त
टिळक स्वराज्य फंडाच्या यादीमध्ये मोठ्या उद्योगपतींपासून ते सर्वसामान्य घरातल्या स्त्रियांपर्यंतचा समावेश असल्याचे आपल्याला आढळते. टिळक स्वराज्य फंडासाठी स्वतः महात्मा गांधी विश्वस्त होते. विश्वस्त मंडळात पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे दिग्गज होते. त्यांना मदत करण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू होते.
ब्रिटिशांची करडी नजर
अर्थात त्याकाळी देखील टिळक स्वराज्य पुंड ब्रिटिशांच्या आणि काही भारतीयांच्या टीकेच्या नजरेतून सुटला नव्हता. टिळक स्वराज्य खंडातून फक्त चरखे वाटण्याला महाराष्ट्रातल्या काही मंडळींचा विरोध होता. त्यामध्ये भालाकार भोपटकर हे नाव अग्रगण्य होते, तर ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याची टिळक स्वराज्य फंडावर नजर होती. परंतु त्या फंडामध्ये ब्रिटिश गुप्तहेर खात्याला कोणतीही “गडबड” आढळली नाही, ही नोंद सध्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे!! तर ही होती टिळक स्वराज्य फंडाची गोष्ट!!
फोटोत दिसत असलेली रक्कम एक 1 कोटी पेक्षा कमी दिसते. कारण ती 1921 सालातली आहे. त्या वर्षानंतरही टिळक स्वराज्य फंड गोळा होतच होता. ती रक्कम 1 कोटी 15 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची नोंद विठ्ठलभाई पटेल यांच्या चरित्रात आहे.