अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ येत असताना चार पीठांच्या चार शंकराचार्यांनी विविध धार्मिक मुद्द्यांची खुसपटे काढून श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला. त्यामुळे अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह यांच्यासारखे काँग्रेस नेते आणि अनेक पुरोगाम्यांना कधी नव्हे एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
आधीच ते राम मंदिर विरोधक, त्यात सनातन हिंदू धर्माच्या चार पीठांच्या चार शंकराचार्यांनी विविध धार्मिक मुद्दे काढून राम मंदिराला विरोध केल्याचे पाहून पुरोगाम्यांच्या दंडातल्या धार्मिक बळच्या बेटकुळ्या फुगल्या!! ज्यांना या शंकराचार्यांची साधी नावे देखील नीट माहिती नाहीत, ज्यांचे काम आणि काज कुठे चालते याची साधी कल्पनाही नाही, त्या सगळ्या पुरोगाम्यांना एकदम हे शंकराचार्य आपल्या एकदम “जवळचे” वाटायला लागले. आपले “बौद्धिक सहयोगी” वाटायला लागले. राजू परुळेकर, मुग्धा धनंजय वगैरे पुरोगाम्यांनी आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर शंकराचार्यांचे राम मंदिर विरोधातले व्हिडिओ व्हायरल केले. “पवार बुद्धीच्या” माध्यमांनी आणि युट्युबर्सनी अनेक पुरोगाम्यांच्या मुलाखती व्हायरल केल्या. यातून या काँग्रेस नेत्यांनी आणि पुरोगाम्यांनी शंकराचार्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे “कढ” काढले. त्यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे कसे रास्त आहेत, याचे “उच्चशिक्षित बौद्धिक” वर्णन केले. श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा कशी शास्त्रविरोधी आहे, असे दावे करून आपला “बौद्धिक कंडू” शमवून घेतला.
पण या सगळ्या पार्श्वभूमीवर श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे प्रमुख आचार्य आणि काशीचे विद्वान गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्ताभोवतीचे सगळे आरोपांचे किटाळ सशास्त्र प्रमाणे देऊन खोडून काढले. त्यांनी 22 जानेवारी 2024 ची सूक्ष्म कुंडली मांडूनच सनातन वैदिक धर्मशास्त्राच्या आधारे सर्व आक्षेप खोडून काढत त्या दिवशीचा सर्वोत्तम मुहूर्त कसा काढून दिला आहे आणि श्री रामलल्लांच्या मंदिराचे काम पूर्ण झालेले नसताना देखील गर्भगृहात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेतून दोष कसा उत्पन्न होत नाही, याचे सविस्तर विवेचन केले. त्यासाठी त्यांनी प्रख्यात विद्वान अण्णाशास्त्री वारे यांच्या “कर्मकांड प्रदीप” या प्रमाण ग्रंथाचाच हवाला दिला.
गणेश्वरशास्त्री द्रविड यांनी दिलेल्या सशास्त्र प्रमाण पुराव्यांनी खऱ्या अर्थाने पुरोगाम्यांचे तोंड फुटले. पण आपले तोंड फुटले, हे मान्य करायला ते प्रामाणिक थोडेच आहेत!! ते बिलकुलच प्रामाणिक नसल्याने त्यांचे मूळ मुद्देच खोटे आणि अप्रामाणिक होते. त्यामुळे गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्यासारख्या विद्ववराने सशास्त्र प्रमाणे देऊन खोडून काढलेले आक्षेप त्यांना समजले तर पाहिजेत ना!! त्यासाठी खऱ्या अर्थाने तेवढी बौद्धिक उंची तर पाहिजे ना, ती या पुरोगाम्यांकडे अजिबात नाही!!
एरवी या पुरोगाम्यांनी शंकराचार्य आणि त्यांची पीठे यांची अनेकदा यथेच्च खिल्ली उडवली होती. टिंगल टवाळी केली होती. त्यांच्या कार्याविषयी शंका आणि खुसपटे काढली होती. हिंदू धर्म सुधारण्यासाठी शंकराचार्यांनी काय केले?? विविध धार्मिक वादांमध्ये शंकराचार्यांनी कोणत्या भूमिका घेतल्या??, त्यामुळे हिंदू धर्मात सुधारणा झाली का नाही??, वगैरे शंका उपस्थित केल्या. या शंकराचार्यांनी या पुरोगाम्यांच्या शंकांना कधी उत्तरे दिल्याचे दिसले नाही. हे सगळे शंकराचार्य आपापल्या पीठांची कामे आपापल्या समजुती आणि वकुबाप्रमाणे करत राहिले.
अयोध्येतल्या राम मंदिरा संदर्भात शंकराचार्य कोर्टाची पायरी जरूर चढली, परंतु अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निर्णयावर विरोध म्हणून ते कधीही सुप्रीम कोर्टात गेले नाहीत. अयोध्येतील वादग्रस्त भूमीचा एक भाग हिंदू पक्षाला, एक भाग मुस्लिम पक्षाला आणि एक भाग श्री रामलल्ला विराजमान यांना असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. तो या शंकराचार्यांनी मान्य केला होता. कारण ते त्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले नव्हते.
आजचे श्री रामलल्लांचे मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारे बांधले जात आहे. यात अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचा काहीही संबंध नाही. अशावेळी शंकराचार्यांना या संपूर्ण उपक्रमातून आपण “बाजूला पडल्याचे” लक्षात आल्याने त्यांनी विशिष्ट धार्मिक कारणे दाखवून श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला आहे. तो त्यांच्या समजुतीचा आणि वकुबाचा भाग आहे. यापलीकडे त्याला विशेष महत्त्व नाही. यशाला अनेक बाप असतात त्या यशाचा काही अंश आपल्याकडे खेचून घेण्याचा चार शंकराचार्यांचा प्रयत्न हा सनातन हिंदू धर्मीयांच्या वादातला अंतर्गत मुद्दा आहे.
पण पुरोगाम्यांना आज जो शंकराचार्यांचा अचानक पुळका येऊन शंकराचार्यांचे हवाले देत त्यांनी जो श्रीराम मंदिराला विरोध चालविला आहे, इथेच खरी पुरोगाम्यांच्या गळक्या मेंदूची मेख आहे. पुरोगाम्यांचे सगळे वैध – अवैध मुद्दे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालाद्वारे खोडून काढले. राम मंदिराला बौद्धिक पातळीवरचा सगळा विरोध मोडून पडला. आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या खोदकामानंतर तिथे प्राचीन मंदिराचे सर्व अवशेष रुपी पुरावे आढळले. त्यामुळे इरफान हबीब, रोमिला थापर यांच्यासारख्या डाव्या इतिहासकारांचे राम मंदिर विरोधातले सगळे ऐतिहासिक पुरावे कोसळले. पुरोगाम्यांचे सगळे बौद्धिक नॅरेटिव्ह सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या आधारे दिलेल्या निकालाने उद्ध्वस्त झाले.
एकीकडे संविधानाच्या आधारासह सुप्रीम कोर्टाने दिलेला श्रीराम मंदिराच्या उभारणीचा निकाल आणि दुसरीकडे सनातन वैदिक धर्मशास्त्राच्या आधारे त्या मंदिरात होणारी श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अशा दुहेरी कात्रीत पुरोगाम्यांनी वर्षानुवर्षे खपून उभे केलेले बौद्धिक जाळे उद्ध्वस्त झाले.
सगळ्या पुरोगाम्यांचे हे खरे “बौद्धिक दुखणे” आहे आणि बुडत्याला काडीचा आधार म्हणून शंकराचार्यांचा आधार घेत त्यांनी राम मंदिराला विरोध करण्याचा नवा फंडा अवलंबला आहे. पण, “पुरोगाम्यांना आता आला शंकराचार्यांचा पुळका पण राम मंदिर विरोधकांचा मेंदूच गळका!!”, हीच काँग्रेस नेत्यांना आणि पुरोगाम्यांना कितीही टोचली तरी यातली वस्तूस्थिती आहे.
Opportunism : 4 Shankaracharyas and so called progressives oppose ram mandir
महत्वाच्या बातम्या
- I.N.D.I.A. मधील जागावाटपावरून पेच कायम, बंगाल-पंजाब-यूपीत अडले आघाडीचे घोडे
- मालदीवने म्हटले- भारताने 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घ्यावे; भारताने म्हटले- दोन्ही बाजूंकडून चर्चा होईल
- श्रीरामांच्या आहाराविषयी बोलणारे शेण खातात, उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा; फडणवीसांचा घणाघात
- Milind Deora Profile : कोण आहेत मिलिंद देवरा, 55 वर्षांपासून होता काँग्रेसशी संबंध, पक्षाने गमावला आणखी एक तरुण चेहरा