वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात वाढत चाललेला कोरोना आणि ओमायक्रोनचा धोका लक्षात घेता आगामी पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक उद्या बोलवली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासह आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. The meeting will discuss the prevailing COVID19 situation for upcoming Assembly elections in five states.
आरोग्य मंत्रालयाचे हे अधिकारी तीनही निवडणूक आयुक्त आणि आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाच राज्यातील कोरोना आणि ओमायक्रोनच्या फैलावासंदर्भात माहिती देतील.
उत्तर प्रदेश गोवा, उत्तराखंड आदी पाच राज्यांमध्ये फेब्रुवारी-मार्च 2022 दरम्यान विधानसभेच्या निवडणुका नियोजित आहेत. या दोन महिन्यांच्या कालावधीत नेमकी कोरोना आणि ओमायक्रोन यांच्या फैलावाची परिस्थिती या राज्यांमध्ये कशी असेल, याविषयी व्यापक विचार-विनिमय निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत होणे अपेक्षित आहे. या बैठकीनंतर निवडणूक आयोग पाच राज्यांतील निवडणुकांत संदर्भात काही ठोस निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
याआधी निवडणूक आयोगाने पाचही राज्यांचा दौरा करून तेथील निवडणूक तयारीची पाहणी केली आहे. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच कोरोना आणि ओमायक्रोनची तिसरी लाट परमोच्च अवस्थेत असेल, असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विचारविनिमय करण्याची गरज निवडणूक आयोगाला वाटली आहे. कोणतीही जोखीम न घेता ही निवडणूक पार पाडणे ही आयोगाची जबाबदारी असल्याने आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे. उद्याच्या बैठकीत या मार्गदर्शक सूचनांवर देखील विचारविनिमय होणार आहे. त्यानंतर निवडणुकीसंदर्भातला अंतिम निर्णय निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.