विशेष प्रतिनिधी
मुंबई : आचार्य अत्रे यांनी ज्यांना लावणी सम्राज्ञी किताबाने गौरविले, त्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक ठसकेबाज लावण्या त्यांनी अमर केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.Sulochana Chavan: An artist from Shri Krishna Bal Mela to Acharya Atre, the empress of planting.
सुलोचना चव्हाण यांचा जन्म मुंबईत 17 मार्च 1933 रोजी झाला. त्यांचे माहेरचे आडनाव कदम. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच श्रीकृष्ण बाळमेळा होता. सार्वजनिक गणेशोत्सवात याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनी सुद्धा काम केले होते. श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल टाकले. मेळ्यांच्या सोबतीत त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केल्या. त्यांची मोठी बहीण स्वतः कला क्षेत्रात नव्हती. परंतु त्या सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत. मात्र सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नव्हते.
त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली ‘सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची’ ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत. पुढे सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ या चित्रपटात गायली. याचे संगीतकार होते वसंत देसाई आणि ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. या गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते ‘मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…’. यानंतरच आचार्य अत्रे यांनीच त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ असा किताब दिला.
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचना चव्हाण यांनी पहिले गाणे गायले. तो हिंदी सिनेमा होता, कृष्ण सुदामा. हे पहिले गाणे गायले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 9 वर्षे. पार्श्वगायनात मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या ‘भोजपुरी रामायण’ गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले.
– सुलोचना यांच्या प्रसिद्ध लावण्या :
नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची, तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं, पाडाला पिकलाय आंबा, फड सांभाळ तुर्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा, कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला, काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा, अशा एकापेक्षा एक लावण्यांनी मराठी रसिक जनांवर भुरळ घातली आहे.
Sulochana Chavan: An artist from Shri Krishna Bal Mela to Acharya Atre, the empress of planting.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शिंदे – फडणवीस सरकारची २०० कोटींची मदत
- रेल्वेत नोकरीची संधी; 2500 हून अधिक पदांवर भरती; ऑनलाईन करा अर्ज
- राज्यसभेत बहुमताने समान नागरी कायदा खासगी विधेयक सादर; विरोधकांचा सूर तीव्र
- हिमाचलात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची जोरात; केंद्रीय पक्ष निरीक्षक म्हणतात, इथे वाद नाही