• Download App
    CPP : काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधीच; पण लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची निवड टळली!! Sonia Gandhi as the leader of the Congress Parliamentary Party

    CPP : काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधीच; पण लोकसभा विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची निवड टळली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : (CPP) अर्थात काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी म्हणजेच काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी काँग्रेस नेत्यांनी आज सोनिया गांधी यांचीच निवड केली. पण लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी राहुल गांधींचे नाव दिले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी ती जबाबदारी स्वीकारायला अजून तरी तयारी दर्शवली नाही. Sonia Gandhi as the leader of the Congress Parliamentary Party

    आज सकाळी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत संपूर्ण काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते पद स्वीकारावे, असा ठराव एकमताने मंजूर केला. परंतु, त्यावर आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन पक्षाला कळवू एवढेच संक्षिप्त उत्तर देऊन राहुल गांधींनी पुढचा विषय टाळला.

    सायंकाळी जुन्या संसद भवनाच्या केंद्रीय सभागृहात काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली त्याचे लोकसभा आणि राज्यसभेतले सगळे खासदार उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तो काँग्रेसच्या सर्व खासदारांनी एकमुखाने मंजूर केला. त्यामुळे सोनिया गांधींची काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी फेरनिवड झाली. मात्र काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतल्या नेतेपदी राहुल गांधींची निवड करणे संसदीय पक्षाने टाळले.

    सोनिया गांधी राज्यसभेमध्ये आहेत. त्यामुळे त्या सभागृहामध्ये पक्षाचे नेतृत्व करू शकतात. त्याचबरोबर सोनिया गांधी या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी अन्य कोणाचीही निवड करू शकतात. काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतला नेता संख्याबळाच्या आधारे लोकसभेतला विरोधी पक्षनेता होऊ शकतो. याच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी राहुल गांधींनी स्वीकारावी, अशी गळ काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीने त्यांना घातली. परंतु ती जबाबदारी स्वीकाराला सध्या तरी राहुल गांधींनी नकार दिला.

    विरोधी पक्षनेत्याचे अधिकार + जबाबदारी

    लोकसभेतले विरोधी पक्ष नेतेपद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. लोकसभेत सरकार मांडत असलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विधेयकावर चर्चेची सुरुवात विरोधी पक्षनेते करत असतात. तो त्यांचा संसदीय परंपरेतला अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्याला अधिकृतरित्या कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. त्याला सर्व सरकारी सुविधा पुरविल्या जातात. संसदेच्या प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले की त्यावरील आभार प्रदर्शन ठरावावरच्या चर्चेची सुरुवात विरोधी पक्षनेते करत असतात. केंद्र सरकार मांडत असलेल्या प्रत्येक बजेटवर किंवा वित्त विधेयकावर, तसेच संरक्षण, शिक्षण, मनुष्यबळ विकास, कौशल्य विकास, रेल्वे, पायाभूत सुविधा, आरोग्य, विविध कल्याण योजना, अंतर्गत सुरक्षा याविषयीच्या महत्त्वाच्या विधेयकांवरच्या चर्चेची सुरुवात विरोधी पक्षनेते करत असतात. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे तो त्यांचा संसदीय परंपरेतला अधिकार असतो ही सर्व भाषणे विरोधी पक्ष नेत्याला संसदीय प्रघात, परंपरा आणि नियम यांच्या कक्षेतच करावी लागतात.

    विरोधी पक्षनेत्याला जसा कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो, तशाच त्याच्या विशिष्ट “शक्ती” आणि विशिष्ट “मर्यादा”ही असतात. या सगळ्या राहुल गांधींना पाळाव्या लागतील. या प्रथा, परंपरा आणि नियम पाळूनच विविध विषयांचा अभ्यास करून राहुल गांधींना मोदी सरकारला घेरावे लागेल. हे सगळे करण्याची तयारी आणि क्षमता राहुल गांधींची आहे का??, हा खरा सवाल आहे. त्यामुळेच राहुल गांधींनी अद्याप विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारली नसल्याची कुजबूज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.

    Sonia Gandhi as the leader of the Congress Parliamentary Party

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!