श्रीरामाने केली अप्रमाणिकांची कोंडी; अयोध्येचे निमंत्रण नाकारताना आणि स्वीकारतानाही उडाली दांडी!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही, तर प्रत्यक्षात तसे घडले आहे म्हणूनच दिले आहे!!Shriram put dishonest leaders in a fix over ram temple inauguration invitation!!
अयोध्येतील श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण राम जन्मभूमी ट्रस्टने INDI आघाडीतल्या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना दिले, पण ते नाकारताना आणि स्वीकारताना या आघाडीतल्या नेत्यांची पुरती भंबेरी उडाली आहे. कारण आमंत्रण स्वीकारावे तर संघ आणि भाजप पुढे शरणागती पत्करल्याचे चित्र निर्माण होते आणि नाकारले, तर श्रीरामांच्या मंदिराला विरोध केल्याचे चित्र निर्माण होते, ही त्यांची खरी कोंडी आहे. त्यामुळे निमंत्रण स्वीकारून प्रत्यक्ष कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका काँग्रेस सह सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी घेतली. यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी यांचा समावेश आहेच, पण त्याचबरोबर आता शरद पवारांना देखील निमंत्रण आल्याने त्यांचा देखील अयोध्येला न जाणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश झाला आहे.
पण हे न जाणे आपल्याला राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही हे पाहून शरद पवारांनी राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपतराय यांना पत्र लिहून आपण अयोध्येला 22 तारखे नंतर एका विशिष्ट दिवशी जरूर येऊ आणि रामाचे श्रद्धापूर्वक दर्शन घेऊ, असे आश्वासन दिले. रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी लाखो भाविक तिथे येतील. त्यांच्यामार्फत तो आनंद सोहळा आपल्यापर्यंत पोहोचेल. या आनंद सोहळ्यासाठी आपल्या शुभेच्छा स्वीकार करा, असे पवारांनी चंपत राय यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले.
पवारांची ही भाषा आणि त्यात वापरलेले “श्रद्धापूर्वक”, “श्रद्धालू” हे शब्द काहीसे पवारांच्या नेहमीच्या भाषेशी पूर्ण विसंगत आहेत. पवारांच्या तोंडी आणि लेखी भाषेत कायम पुरोगामीत्व झलकत असते. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, तो फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवतो. येथे समाज सुधारणावादी डावे विचार चालतात. उजव्या जातीयवादी विचारांना महाराष्ट्रात थारा मिळत नाही, वगैरे “बहुमोल विचार” पवार नेहमी व्यक्त करत असतात. त्यामध्ये “श्रद्धा”, “श्रद्धाळू” “शुभेच्छांचा स्वीकार”, “श्रीराम” वगैरे भाषेचा अथवा शब्दांचा बिलकुलच समावेश नसतो. पण चंपत राय यांना लिहिलेल्या पत्रात मात्र पवारांची भाषा पूर्ण बदलली आहे.
याच पवारांच्या गटाचे नेते जितेंद्र आव्हाड मात्र दररोज श्रीरामांविषयी वेगवेगळी वक्तव्य करून ती नंतर मागे घेताना दिसत आहेत. आधी ते श्रीराम मांसाहार करत होते, असे म्हणाले. पण त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संताप उसळल्याचे बघताच त्यांनी ते वक्तव्य मागे घेतले. कालच ते आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण ठेवायला हवे होते, असे म्हणाले. कारण न्यायव्यवस्थेतून येणारा न्याय जातीवादाचा वास घेऊन बाहेर येतो, असे म्हणाले होते. आज त्यांनी त्या वक्तव्यावरून “यु टर्न” केला.
ही खरी श्रीरामाने पवारांची आणि त्यांच्या निष्ठावंतांची उडवलेली भंबेरी आहे. काँग्रेस सारखे अयोध्येचे निमंत्रण धड नाकारता येत नाही आणि धड स्वीकारताही येत नाही म्हणून पवारांनी मधला मार्ग म्हणून अयोध्येच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन ते मोकळे झाले.
तसेही पवार अयोध्येतल्या कार्यक्रमाला गेले असते, तर तिथे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या पाहुण्यांच्या रांगेत त्यांना कुठल्या स्थानावर बसवले असते??, हा प्रश्नच आहे. कारण मोदी सरकारच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रपती भवनात पवारांचे स्थान पाचव्या रांगेत होते. म्हणून त्यांनी शपथविधीला जाण्याचे टाळले होते. अयोध्येच्या कार्यक्रमात पवारांना असेच मागच्या कुठल्यातरी रांगेत बसावे लागले असते. त्यामुळे पवारांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन प्रत्यक्षात 22 जानेवारीला जाण्याची तिथे टाळले. त्यातून त्यांची उडालेली भंबेरी मात्र दिसायची राहिली नाही.
जे पवारांचे तेच राहुल गांधी, ममता बॅनर्जी किंवा आघाडीतल्या अन्य नेत्यांचे झाले आहे. राहुल गांधी 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाहीत, कारण त्यांना मूळात निमंत्रणच नाही. त्यादिवशी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेत आसाम मध्ये असतील. त्यामुळे ते 22 जानेवारीला कामाख्या मंदिरात जाऊन अथवा तिथल्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे घाटत आहे. त्यांचा तो कार्यक्रम निश्चित केला जात आहे.
ममता बॅनर्जी 22 जानेवारीला कोलकत्यात काली मंदिरात जाऊन काली मातेची पूजा करणार आहेत आणि त्यानंतर त्या सर्वधर्म सद्भावना यात्रेत सामील होणार आहेत. त्यादिवशी कोलकत्यात ममतांच्या पुढाकाराने ही सर्वधर्म सद्भावना यात्रा तृणमूळ काँग्रेस काढणार आहे.
अयोध्येतला कार्यक्रम हा फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा आहे. त्यामुळे आपण तिथे जाणार नाही अशी वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांची भूमिका आहे, पण आधी याच नेत्यांच्या पक्षांनी श्री रामलल्लांचे प्रत्यक्ष अस्तित्व नाकारून ते “काल्पनिक” असल्याचे प्रतिज्ञापत्र थेट सुप्रीम कोर्टापर्यंत सादर केले होते, पण आता राम मंदिर प्रत्यक्षात अस्तित्वात आले. तिथे श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही होत आहे आणि त्याला देशात आणि परदेशात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हे पाहून खरे म्हणजे INDI आघाडीतल्या नेत्यांच्या पायाखालची राजकीय वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांची “धरले तर चावते आणि सोडले तर पळते,” अशी त्यांची अवस्था होऊन अयोध्येचे निमंत्रण स्वीकारताना अथवा नाकारताना त्यांची भंबेरी उडाली आहे.
रामाने आणली “अशी” वेळ
आपण हिंदू विरोधी नाही, हिंदू धर्माच्या विरोधात नाही हे मोठ्या आवाजात सांगण्याची वेळ या नेत्यांवर रामाने आणली आहे. ते प्रामाणिक असते, त्यांची धर्मनिरपेक्ष भूमिका शंभर नंबरी असती, तर त्यांना अशी कुठल्या मंदिरांमध्ये धावाधाव करावी लागली नसती किंवा आपण राम विरोधी नाही हे मोठ्या आवाजात सांगावे लागले नसते. पण आयोध्यातल्या कार्यक्रमाने आणि त्याच्या निमंत्रणाने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. त्यातूनच त्यांना त्यांना कुठल्या ना कुठल्या मंदिरात धावाधाव करावी लागत आहे. अन्यथा श्रीराम विरोधी, हिंदू विरोधी शिक्का आपल्या कपाळावर बसण्याची भीती त्यांना वाटत आहे. तसा शिक्का बसला तर आपले आणि आपल्या पक्षाचे अस्तित्व कायमचे संपण्याची संपण्याचा धोका त्यांना जाणवला आहे. म्हणूनच INDI आघाडीतल्या नेत्यांमध्ये राम मंदिराला शुभेच्छा देण्याच्या पत्रांची आणि मंदिरा मंदिरांमध्ये धावण्याची स्पर्धा लागली आहे.
Shriram put dishonest leaders in a fix over ram temple inauguration invitation!!
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांतून सुरजागड इस्पात गडचिरोलीत करणार 10,000 कोटींची गुंतवणूक!!
- WATCH : काश्मीरची मुस्लिम विद्यार्थिनी बतुल जहरा गाते राम भजन, सांगितले हे खास कारण
- राम भजन म्हणायचे आवाहन केल्यामुळे मल्याळम गायिका चित्रा सोशल मीडिया ट्रोल; पण रामभक्तांचा मिळाला जबरदस्त पाठिंबा!!
- उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचा केला मोठा इव्हेंट; पण सुनावणीत कायद्याचा किस पाडण्यात का गेले फेल??