वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भवानीपूर मधील पोटनिवडणूक जवळ आली असताना भाजपने राज्य पातळीवर संघटनात्मक मोठा बदल केला आहे. प्रदेशाध्यक्षपदी सुकांत मुजुमदार यांची निवड करण्यात आलीShoulder shift in Bengal BJP to prevent fall; Sukant Mujumdar State President; Dilip Ghosh National Vice President
असून पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची बढती देऊन त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. भाजपमधून होणारी पडझड रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन्ही नेत्यांनी आपापल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले असून नवी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींना दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नाव पाच वर्षांपूर्वी कुणी घेतही नव्हते. आज भाजपची राजकीय ताकद तृणमूल काँग्रेसच्या बरोबरीची झाली आहे.
भाजप आज जरी विरोधी पक्षात बसला असला तरी मतांच्या टक्केवारीत पक्षाने तृणमूल काँग्रेसला जबरदस्त टक्कर दिली आहे. गेल्या पाच वर्षातला माझा अनुभव सकारात्मक आहे. या अनुभवातूनच पक्षाने मला राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, असे दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितले.
तर सुकांत मुजुमदार यांनी यावेळी नवी जबाबदारी स्वीकारताना पुढच्या पाच वर्षात तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची ग्वाही दिली आहे. बंगालमध्ये येत्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत पासून महापालिकेपर्यंत महत्त्वाच्या निवडणूका आहेत.
तेथे तृणमूल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करेल. आणि तो तृणमूळ काँग्रेसवर मात करून दाखवेल, असा विश्वास सुकांत मुजुमदार यांनी व्यक्त केला आहे.
भाजपमधून एकापाठोपाठ एक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये चाललेले असताना भाजपने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास भरण्यासाठी हा बदल केल्याचे बोलले जात आहे. सुकांत मुजुमदार आता पश्चिम बंगालचा राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. यामध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.