विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या मतदारांनी शरद पवारांचे दगाफटक्याचे राजकारण 20 फूट जमिनीत गाडले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. त्या टीकेवरून संतप्त झालेल्या शरद पवारांनी भर पत्रकार परिषदेत अमित शाह यांना तडीपार गृहमंत्री आणि श्याम भटाची तट्टाणी असे म्हणत 1978 चा स्वतःला अनुकूल ठरणारा “निवडक” इतिहास सांगितला.
भाजपच्या शिर्डीतल्या महा अधिवेशनामध्ये समारोपाचे भाषण करताना अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघाती राजकारणाचा उल्लेख करत महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांचे राजकारण 20 फूट जमिनीत गाडले, असे शरसंधान साधले होते. अमित शाह यांनी या एका वाक्यातल्या टीकेतून भाजप मधल्या पवार प्रेमींना देखील जोरदार धक्का दिला होता. पवारांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीतली एन्ट्री रोखली होती. या पार्श्वभूमीवर पवारांनी दोन दिवसानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. मात्र त्यावेळी त्यांनी “सिलेक्टेड” इतिहासच सांगितला.
वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. याबद्दल पवार या पत्रकार परिषदेत काही बोलले नाहीत त्या उलट 1978 च्या पुलोद मंत्रिमंडळात जनसंघाचे किती आणि कसे मंत्री होते, याचा उल्लेख पवारांनी पत्रकार परिषदेत केला.
शरद पवार म्हणाले :
आज जे गृहमंत्री पदावर बसले आहेत, ते अत्यंत प्रतिष्ठेचे महत्त्वाचे पद महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण वगैरे उत्तुंग नेत्यांनी भूषविले होते. त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा राखली होती.
आजचे गृहमंत्री ज्या गुजरात राज्यातून येतात, त्या गुजरात राज्यात बाबुभाई पटेल, चिमणभाई पटेल यांच्यासारखे उत्तम प्रशासक मुख्यमंत्री पदावर राहिले. मात्र यापैकी कोणालाही त्यांच्या राज्याने तडीपार केलेले नव्हते.
– 1978 मध्ये मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आजचे गृहमंत्री नेमके कुठे होते ते मला माहिती नाही. पण त्यावेळी माझ्याबरोबर उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, डॉ. प्रमिलाताई टोपले हे जनसंघाचे नेते मंत्रिमंडळातले सहकारी होते. उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री होते. हशू अडवाणी नगरविकास मंत्री होते, तर प्रमिला ताईंकडे आरोग्य खाते होते. आमच्या पुलोद आघाडीमध्ये वसंतराव भागवत, प्रमोद महाजन यांनी समन्वयाचे काम केले होते. त्यावेळी विविध पक्षांमधल्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता आजच्यासारखी पातळी घसरलेली नव्हती.
– पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात देखील सर्व पक्षांच्या नेत्यांची सुसंवाद साधण्याचा प्रघात होता. वाजपेयींनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत मला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देऊन डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे उपाध्यक्ष नेमले होते. त्यामुळे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुणाची तट्टाणी अशी जी मराठी म्हण आहे ती मला आठवते. यापेक्षा मला गृहमंत्र्यांच्या टीकेवर जास्त भाष्य करायचे नाही.
– ज्या आजच्या गृहमंत्र्यांना गुजरात राज्याने तडीपार केले होते तेव्हा ते मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आश्रय मागत होते. यासंदर्भात माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे जास्त माहिती सांगू शकतील.
Sharad pawar target to amit shah
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या..आशिष शेलार यांची टीका
- अपघातग्रस्तांची मांदियाळी” देशाच्या प्रमुखपदी बसली; आरोप – प्रत्यारोपांची राळ उडाली!!
- California : कॅलिफोर्नियातील आगीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू; 16 लाख कोटी रुपयांचे नुकसान
- Vijay Sivatare : वाल्मीक कराडची विषवल्ली, अजितदादांना काही वाटत नाही, विजय शिवतारे यांचा थेट निशाणा