विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातल्या हिंसक राजकारणाच्या चिखलात अडकली आहे शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती, पण आता ती निपटायला पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र!!
बीड जिल्ह्यामध्ये शरद पवारांनी पोसलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने हिंसाचाराचा धुमाकूळ घातला. तिथे वाल्मीक कराड सारखे राख माफिया निर्माण केले. हे सगळे 2024 किंवा 2025 मध्ये घडले नाही, तर हे काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पासूनच घडत होते. त्यातूनच धनंजय मुंडे यांना पवारांनी मुंडे परिवारातून फोडले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून वेगवेगळी पदे दिली. धनंजय मुंडे यांच्यामार्फतच बीड मधली गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासली गेली. त्यावेळी पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी त्याकडे तर दुर्लक्ष केले किंवा त्या गुन्हेगारी प्रवृत्तींचे वेगवेगळ्या प्रकारे भरण पोषण केले, पण आता ती गुन्हेगारी प्रवृत्ती उफाळून वर आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरण घडले. हे प्रकरण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात थेट राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचले त्यामध्ये अजित पवारांविषयी शंका व्यक्त व्हायला लागली.
शरद पवार + सुप्रिया सुळे + रोहित पवारांबरोबर वाल्मीक कराडचे फोटो व्हायरल झाले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना वाल्मीक कराड बरोबरच्या जुन्या संबंधांची कबुली द्यावी लागली. शरद पवारांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस नावाची प्रवृत्ती संशयाच्या दाट घेऱ्यात अडकली. एवढे होऊन देखील अजित पवार अजून या सगळ्या प्रकरणात नामानिराळे राहिले.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बीड जिल्ह्यातल्या हिंसाचाराबद्दल “चिंता” व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले.
हे पत्र असे :
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.