• Download App
    Shakti Samvad : राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यांच्या महिला आयोगांची बांधली एकजूट; सुरक्षितता आणि सक्षमीकरणाबरोबरच महिलांना दिला शक्तीचा आत्मविश्वास!!

    Shakti Samvad : राष्ट्रीय महिला आयोगाने राज्यांच्या महिला आयोगांची बांधली एकजूट; सुरक्षितता आणि सक्षमीकरणाबरोबरच महिलांना दिला शक्तीचा आत्मविश्वास!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद उपक्रमातून देशातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगांची एकजूट बांधली. या एकजुटीतून सुरक्षिततेबरोबरच सक्षमीकरण आणि शक्तीचाही आत्मविश्वास महिलांना दिला, अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी शक्ती संवाद उपक्रमाचा आज समारोप केला. Shakti Samvad

    राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र महिला आयोगाच्या सहकार्याने 22 आणि 23 ऑगस्ट अशा दोन दिवसांच्या शक्ती संवाद उपक्रमाचे मुंबईत आयोजन केले होते. या कार्यक्रमाला देशातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या. शक्ती संवाद उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले. त्या कार्यक्रमाला विधान मंडळाचे प्रमुख, प्रा. राम शिंदे, राहुल नार्वेकर त्याचबरोबर राज्य सरकारमधील मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते. Shakti Samvad

    शक्ती संवादाच्या उपक्रमामध्ये देशभरातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगांच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाबरोबरच महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यापक विचार विनिमय करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोग आणि अन्य राज्यांचे महिला आयोग यांनी समन्वयाने काम केले, तर महिलांना सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या शक्तीसंचयाचा देखील प्रत्यय देता येईल. त्याचा सकारात्मक परिणाम देशभर दिसेल. महिला आत्मविश्वासाने पुढे येऊन आपल्या कामामध्ये कौशल्य दाखवून देशाच्या विकासात अधिक मोलाचे योगदान देऊ शकतील, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी समारोप समारंभात काढले. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

    आव्हानांचे रूपांतर संधीत करूया : विजयाताई रहाटकर

    राष्ट्रीय महिला आयोगाचे काम करताना, तसेच राज्यांच्या महिला आयोगाचे काम करताना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु आपले ध्येय निश्चित असेल आणि आपला मार्ग उन्नत असेल, तर कुठल्याही आव्हानांचे रूपांतर आपण संधी मध्ये करू शकतो, हे राष्ट्रीय महिला आयोगाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. महिला अधिकाराची जपणूक करतानाच महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांना आत्मविश्वासाने समाजासमोर आणणे, आपल्या पायावर उभे करणे, यामध्ये महिला आयोग सक्रीय योगदान वाढवू शकतात. राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्यांचे महिला आयोग यांनी समन्वयाने कार्य केले, तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. लिंग भेदभाव दूर करून स्त्री पुरुष समानतेच्या आधारावर संपूर्ण समाजाला अग्रेसर करता येईल, हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अनुभवाला आले आहे, असेही विजयाताई रहाटकर यांनी स्पष्ट केले‌.



    शक्ती संवाद हा काही फक्त शाब्दिक फुलोरा नाही, तर महिलांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना आत्मविश्वासाची उभारी देणारा उपक्रम आहे. तो आपण एकत्र येऊन पुढे नेला, तर आपल्या कामातले अडथळे तर दूर होतीलच, पण ते अडथळे आपल्याला उन्नतीच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी पायऱ्यांसारखे उपयोगी ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

    शक्ती संवादाची अशी ठरली रूपरेषा

    शक्ती संवादाचा पहिला उपक्रम श्रीरामाच्या अयोध्येत झाला होता, तर दुसरा उपक्रम मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये संपन्न झाला. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय योजना या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

    • राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद कार्यक्रमाची दोन दिवसांची सविस्तर रूपरेषा निश्चित केली होती. पहिल्या दिवशीच्या परिसंवादांमध्ये देशातल्या महिला आयोगांसमोर असलेली आव्हाने आणि संधी, त्याचबरोबर मानवी तस्करी विरोधातील कायदे आणि अंमलबजावणी, विविध संस्थांमधील समन्वय यांचा समावेश होता.
    • त्याचबरोबर पहिल्या दिवशी बीजिंग जाहीरनाम्यानुसार देशात महिला कायद्यांची अंमलबजावणी आणि त्यापुढील आव्हाने आणि संधी या विषयावर देखील परिसंवाद झाला.
    • दुसऱ्या दिवशीच्या शक्ती संवादात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर क्राईम सिक्युरिटी या अंतर्गत महिलांना येणाऱ्या समस्या त्याचबरोबर त्या सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या संधी यावर झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
    • राज्यघटना निर्मितीत महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. पण तो विषय आत्तापर्यंत फारसा जनमानसासमोर आला नव्हता. या पार्श्वभूमीवर भारतीय महिला आयोगाने पुढाकार घेऊन राज्यघटनेच्या निर्मितीत महिलांचे योगदान या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केला. घटना समितीच्या 15 महिला सदस्यांच्या योगदानाची या परिसंवादात विशेष चर्चा झाली. मुंबईतल्या शक्ती संवादाचे हे मोठे वैशिष्ट्य ठरले.
    • “केअर मॅटर्स” या थीम वर आधारित एक परिसंवादात अनपेड केअर वर्क्स या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि काळजी त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी लिंग समानता, या विषयावर भर देणाऱ्या परिसंवादाचाही शक्ती संवादात आवर्जून समावेश केला होता.
    • भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्या अंतर्गत महिला विषयक कायदेशीर चौकटीचा विस्तार आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर देशातल्या सर्व महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रतिनिधी यांचे विशेष सत्र घेण्यात आले. त्यामध्ये महिलांची सुरक्षितता त्यांचे अधिकार, त्यांची सामाजिक, आर्थिक जबाबदारी आणि समाजाचे महिलांप्रती असलेले दायित्व यावर भर देण्यात आला.
    • राष्ट्रीय महिला आयोगाने देशातल्या विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींची एक सल्लागार समिती नेमली आहे. महिला विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी प्रभावी सूचना करण्याचे काम ही समिती करते. या समितीच्या सदस्यांनी देखील शक्ती संवादामध्ये सहभागी होऊन आपले मोलाचे योगदान दिले.

    Shakti Samvad in Mumbai ends with empowerment and self confidence improvement for women

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MM Naravane : माजी लष्करप्रमुख म्हणाले- भारत-चीन संबंध सुधारत आहेत; पुढे जाऊ तसा चीनही सद्भावनेला प्रतिसाद देईल

    Rajnath Singh : राजनाथ सिंह म्हणाले- मुनीर यांनी आपले अपयश स्वीकारले; भारताने कठोर परिश्रमाने फरारी कारसारखी अर्थव्यवस्था उभारली

    Modi : कोलकात्यात मोदी म्हणाले- TMC जाईल तेव्हाच बंगालचा विकास होईल; ममता सरकारची गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारासाठी ओळख