पंडित नेहरूंनी सोनेरी छडी म्हणून वापरलेल्या सिंगोल अर्थात राजदंडाबद्दल साने गुरुजींनी काय लिहिले आहे, याची माहिती नुकतीच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उमरीकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. Sane guruji wrote about singol in 1948
– ती अशी :
२ हजार वर्षांपुर्वीच्या कुरल ग्रंथात सिंगोल (राजदंड) चा संदर्भ…
सध्या चोल राजवटीतील सत्ता हस्तांतराचे प्रतिक असलेल्या सिंगोलची (राजदंड) चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
हा राजदंड इंग्रजांकडून सत्ता हस्तांतराप्रसंगी पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारला. प्रयागराजच्या वस्तुसंग्रहात धुळखात पडलेला हा राजदंड भारतीय संसदेच्या नवीन इमारतीत, लोकसभा सभापतीच्या आसनाजवळ स्थापित करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आणि त्यावरूनच चर्चा सुरू झाली.
अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. यावरील चर्चेत या सिंगोलचा उल्लेख तमिळ दलित संत तिरूवल्लुवर यांच्या “कुरल’ या महान प्राचीन (२००० हजार वर्षांपुर्वीचा) ग्रंथात असल्याचे भाजप तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी सांगितले.
माझी उत्सुकता चाळवली. या कुरलचा गद्य अनुवाद पुज्य साने गुरूजींनी १९३० मध्ये त्रिचनापल्लीच्या तुरूंगात असताना केला होता. या ग्रंथाला ‘तमिळ वेद’ असे गौरवाने संबोधले जाते.
यात एकुण १३३ सर्ग आहेत. प्रत्येक सर्गात १० श्लोक आहेत. मी या ग्रंथाचा पद्य अनुवाद अभंग वृत्तात करतो आहे. यातील ३० सर्ग – ३०० श्लोकांचा अनुवाद पुर्ण झाला आहे. आण्णामलाई यांच्या उल्लेखाने मी काल रात्री सर्व ग्रंथ चाळला तेव्हा ५५ व्या ‘न्यायी राज्य’ नावाच्या सर्गात सिंगोल (राजदंड) चा उल्लेख आढळला.
या दहा श्लोकांचा मराठी अभंग वृत्तातला अनुवाद जो मी नुकताच केलाय तो खाली देत आहे.
श्रेष्ठ राजा तो जो । सल्ल्याने वागतो ।
न्यायाने चालतो । निष्पक्षपणे ।।५४१।।
जागवितो मेघ । आशा ती उदंड ।
तैसा राजदंड । शासनात ।।५४२।।
विद्या नि धर्माचा । मुख्य जो आधार ।
गळा शोभे हार । राजदंड ।।५४३।।
प्रेमाने प्रजेचा । करी जो सांभाळ ।
सत्तापद माळ । सदा गळा ।।५४४।।
न्यायाने जो राजा । राजदंड धरी ।
‘वर्षा’ कृपा करी । राज्यावरी ।।५४५।।
विजय मिळतो । निष्पक्ष न्यायाने ।
मिळे जो युद्धाने । खरा नव्हे ।।५४६।।
भेदाभेद नाही । निष्पक्ष वागतो ।
तयाला रक्षतो । राजदंड ।।५४७।।
प्रजेहून दूर । भितो चिकित्सेला ।
तयाच्या नाशाला । शत्रु कशाला ।।५४८।।
शत्रुपासुनिया । प्रजेचे रक्षण ।
करि जो शासन । योग्य तेच ।।५४९।।
दुष्टांसी देहांत । शासन करावे ।
तण उपटावे । शेतातले ।।५५०।।
कुरल
गद्य अनुवाद : साने गुरूजी
पद्य अनुवाद : श्रीकांत उमरीकर.
(कुरल, कवि तिरूवल्लुवर, अनुवाद साने गुरूजी, काँटिनेंटल प्रकाशन, प्रथम आवृत्ती १९४८, पृ. क्र. ८१)