विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : देशात मुसलमानांसाठी जर वक्फ बोर्ड कायदा लागू असेल, तर केंद्रातील मोदी सरकारने सनातनी हिंदूंसाठी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम आणला पाहिजे, असा ठराव प्रयागराज महाकुंभामध्ये घेतलेल्या सनातन धर्म संसदेत मंजूर करण्यात आला. या धर्म संसदेमध्ये सनातन हिंदू धर्मातील सर्व धर्माचार्य उपस्थित होते. या सर्वांनी एकमताने सनातन हिंदू बोर्ड अधिनियमावर स्वाक्षरी करत मोदी सरकारकडे तो लागू करण्याची मागणी केली.
सनातन धर्म संसदेत अध्यात्मिक गुरु देविकानंद ठाकुरजी यांनी सनातन हिंदू बोर्ड अधिनियमा संदर्भात माहिती दिली. मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मुक्ती त्याचबरोबर दिल्लीतल्या जामा मशीद येथील पायऱ्याखाली असलेली ठाकूरजींची प्रतिमा तिथून काढून पुनर्स्थापित करणे या मुद्द्यांवर ठाकुरजी यांनी भर दिला. यासंदर्भात सनातन धर्म संसदेने ठराव मंजूर केले.
त्याचबरोबर सनातन धर्म संसदेने सनातन हिंदू बोर्ड अधिनियम लागू करण्यासंदर्भातही ठराव मंजूर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रयागराज मध्ये आले होते. त्यांनी त्रिवेणी संगम येथे पूजा करून स्नान केले. त्यानंतर ते सनातन धर्म संसदेत पोहोचणार होते. परंतु, प्रचंड गर्दीमुळे ते पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती देविकानंदन ठाकुरजी यांनी दिली.
देशात मुस्लिमांसाठी जर वक्फ बोर्ड कायदा लागू असेल, तर सनातनी हिंदूंसाठी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम आणला पाहिजे. सनातन धर्म संसदेने तसा ठराव मंजूर केला आहे. पंतप्रधान मोदींची यासंदर्भात आम्ही सगळे संत चर्चा करू. मोदी सरकार सनातन हिंदू बोर्ड अधिनियम लागू करेल, असा विश्वास ठाकुरजी यांनी व्यक्त केला.