75 ची रिटायरमेंटची शाल, मोहन भागवतांचे शालजोडीतले उद्गार आणि त्या पलीकडचा खरा स्थित्यंतराचा विचार!!, हे काही सहज सुचलेले शीर्षक नाही. देशाच्या राजकीय वातावरणामध्ये सध्या रिटायरमेंट या शब्दाची चलती असताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी एका समारंभात भाषण केले. त्यामध्ये त्यांनी 75 ची शाल अंगावर पडली की समजायचे आपण आता रिटायर्ड व्हायला पाहिजे. आपण बाजूला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे, असे उद्गार काढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि रामजन्मभूमी आंदोलनाचे नियोजनकर्ते मोरोपंत पिंगळे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्यांनी मोरोपंतांच्या आठवणी सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी 75 ची शाल अंगावर पडली ती आपण रिटायर्ड व्हायचे असते, असे मोरोपंतांनी म्हटल्याचे सांगितले.
देशाच्या राजकीय वातावरणात रिटायरमेंट या शब्दाची चलती असताना सरसंघचालकांनी त्याच विषयावर भाषण केल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि माध्यमांना चघळायला राजकीय खाद्य मिळाले. सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सूचक पद्धतीने रिटायर्ड व्हायला सांगितले, असे उद्गार संजय राऊत यांनी काढले. त्यामुळे देशातल्या सगळ्या विरोधकांना आनंदाची उकळी फुटली. थेट सरसंघचालकांनी रिटायरमेंटचा विषय काढल्याने आता भाजपमध्ये मोठा बदल होणार, मोदी रिटायर्ड होणार, त्यांच्या जागी नवीन कोणीतरी पंतप्रधान होणार, अशा अटकळी बांधायला सुरुवात झाली. जणू काही मोदी खरंच रिटायर्ड होण्यासाठी फक्त मोहन भागवतांच्या वक्तव्याचीच वाट बघत होते, अशी राजकीय वातावरण निर्मिती विरोधकांनी चालवली.
प्रत्यक्षात मोदींचे 75 वर्षांचे होणे आणि त्याचवेळी मोहन भागवत देखील 75 वर्षांचे होणे, हा एक साधारण योगायोग आहे. कारण दोघांचे जन्म वर्ष आणि महिना एकच आहे. पण त्यामध्ये कुठलाही रिटायरमेंट प्लॅन वगैरे असले काही असण्याची शक्यता नाही आणि असले काही असेलच तर ते माध्यमांच्या किंवा विरोधकांच्या चर्चेसारखे उथळ असण्याची शक्यता नाही. कारण संघात किंवा भाजपमध्ये जे काही बदल किंवा स्थित्यंतरे होतात किंवा पिढीतला बदल होतो, त्यामागे दीर्घ विचार विनिमय करायची परंपरा राहिली आहे आणि हा विचार विनिमय माध्यमे किंवा संघबाह्य परिवाराचा विषय नसतो. तो नेहमीच संघ परिवाराचा अंतर्गत विषय राहतो.
संघ परिवारात आणि भाजपमध्ये ज्या ज्या वेळी मोठी परिवर्तने झाली, त्याची साधी भनक देखील पूर्वी कधी माध्यमांना लागली नव्हती. त्याचे कारणच संघ परिवारात उथळ पद्धतीने कुठल्या गंभीर विषयाची चर्चा होत नाही, तर ती अधिक खोलवर आणि अधिक व्यापक पद्धतीने करायची संघाची पद्धत आहे.
मोदी + भागवत केमिस्ट्री
त्यामुळे मोहन भागवतांच्या एका वक्तव्याने मोदी रिटायर्ड होतील आणि पंतप्रधान पदावरून बाजूला होतील, असे समजायचे कारण नाही. त्याचबरोबर मोहन भागवत देखील अशा सूचक पद्धतीने मोदींना कुठला इशारा देतील, याची शक्यताही नाही. कारण मोदी आणि भागवत यांच्यातील “पॉलिटिकल आणि सोशल केमिस्ट्री” माध्यमी आकलनाच्या आणि अकलेच्या पलीकडची आहे. ते एकमेकांना सहजपणे भेटू शकतात आणि सहजपणे विचारविनिमय करू शकतात, जे बाहेर कुठल्याही माध्यमांना कळायची सुतारम शक्यता नसते.
गुरुजी आणि बाळासाहेब देवरस
संघातला मूलभूत आणि अमुलाग्र बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गुरुजी नंतर त्यांनीच नेमलेले सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे गुरुजींपेक्षा विचाराने आणि विचार प्रवृत्तीने बरेच वेगळे ठरलेले सरसंघचालक होते. गुरुजी आध्यात्मिक प्रवृत्तीचे संघ नेते होते, तर बाळासाहेब देवरस सामाजिक आणि राजकीय विचारसणीच्या विस्ताराकडे विशेष लक्ष पुरविणारे संघ नेते होते. गुरुजींनी स्वतःच्या विचार आणि पद्धतीने संघविस्तार केला, तर बाळासाहेब देवरसांनी वेगळ्या विचार पद्धतीने संघ अधिक व्यापक केला. त्यांच्याच कालावधीत संघ परिवाराचा अधिक मोठा विस्तार झाला. दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती वेगवेगळ्या काळात समन्वयाने कसे काम करू शकतात, ही त्यांची उदाहरणे ठरली.
आता सुद्धा मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर ते स्वतः किंवा मोदी रिटायर्ड होतील किंवा न होतील, संघ आणि संघ परिवारातला बदल होतच राहील. ते मोठे स्थित्यंतर असेल, पण त्यात केवळ व्यक्ती बदल करायचा म्हणून तो बदल होणार नाही तर काळाची गरज, नवीन आव्हाने आणि नवीन संधी पेलण्याची क्षमता या निकषांवर बदल केले जातील. अर्थात हा विचार मोहन भागवतांच्या भाषणातली शाल आणि त्यातले शालजोडीतले जोडे शोधणाऱ्या विरोधकांच्या आणि माध्यमांच्या आकलनाच्या आहे. त्यामुळे ते फक्त मोहन भागवतांच्या भाषणातले शालजोडीतले जोडे बसतील. त्यावर माध्यमांमध्ये राळ उडवत राहतील, पण त्या पलीकडे जाऊन भाजप आणि संघ परिवार स्वतःमध्ये मोठे स्थित्यंतर घडवून आणतील, ज्याची खऱ्या अर्थाने विरोधकांना आणि माध्यमांना भनकही लागणार नाही.
RSS and BJP are in a position of big transition but beyond opposition’s political wisdom
महत्वाच्या बातम्या
- PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…
- Sri Lanka : श्रीलंकेने म्हटले- कोणत्याही किंमतीत कच्चाथीवू बेट सोडणार नाही; कायदेशीररीत्या ते आमचे
- पूर आला, पण भक्तीचा ओघ नाही थांबला; भर पावसातही गोदावरी मातेची महाआरती संपन्न
- Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार