• Download App
    संघाच्या पथ संचलनात अडथळा; द्रमूक सरकारची मोठी राजकीय चूक!! Route March by RSS Swayamsevaks in Chennai, Tamil Nadu.

    संघाच्या पथ संचलनात अडथळा; द्रमूक सरकारची मोठी राजकीय चूक!!

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात अडथळा आणणे ही तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षाच्या एम. के. स्टालिन सरकारची फार मोठी चूक ठरली. सरकारने जंग-जंग पछाडल्यानंतरही संघाचे पथ संचलन ते रोखू शकले नाही. उलट जी संचलने दुर्लक्षित राहिली असती, त्या संचलनांना मोठी प्रसिद्धी मिळाली, सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक खावी लागली, इतकेच नाही तर तामिळनाडूतील हिंदू संघटनांचा देखील संघाला जोरदार पाठिंबा मिळाला. Route March by RSS Swayamsevaks in Chennai, Tamil Nadu.

    द्रमूक सरकारने आधी सत्तेच्या आणि नंतर न्यायालयाच्या माध्यमातून आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. रविवार, १६ एप्रिलला राज्यात ४५ ठिकाणी पथ संचलन झाले. त्याला अपार प्रतिसादही लाभला. जनमानसांत चर्चा झाली आणि माध्यमांतही जागा मिळाली. जी गोष्ट नित्यनेमाने सहज होणार होती, तिला अडथळा आणायचा प्रयत्न केला आणि एरवी जी दुर्लक्षित राहिली असती तिला ठळकपण मिळवून दिले. द्रविडी अस्मितेच्या नावाने हडेलहप्पी करणाऱ्यांच्या पदरी यातून काय पडले? काहीच नाही, मात्र संघशक्तीच्या सत्याचा प्रत्यय मात्र पुन्हा आला.

    तमिळनाडूत झालेल्या या ४५ पथ संचलनातील प्रमुख संचलन हे चेन्नईतील कोरट्टूर येथे झाले. संघाचे दक्षिण क्षेत्र संघचालक डॉ. आर. वन्नीयराजन आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांचा त्यात प्रमुख सहभाग होता. याशिवाय फेडरेशन ऑफ ऑल चेट्टियार संघाचे प्रदेशाध्यक्ष अरुणाचलम, तमिळनाडू नाडर संघाचे नेते प्रदेशाध्यक्ष मुथ्थू रमेश, वीर वन्नियार संघाचे प्रदेशाध्यक्ष जय हरी, बोयार संघाचे प्रदेशाध्यक्ष बालचंदर, सौराष्ट्र समुदायाचे अध्यक्ष एस. आर. अमरनाथ, माया वंश महासभेचे राज्य सचिव एस. के. शिवकुमार, व्हिलेज पीपल्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सी. पी. पच्छैयप्पन, परियार असोसिएशनचे रविकुमार इत्यादी सहभागी झाले होते. या सर्व संघटना तमिळनाडूतील सर्व थरांतील आणि सर्व समुदायांतील प्रतिनिधी करतात.

    वास्तविक संघाचे संचलन हा संघाच्या दैनंदिन व्यवहाराचा एक भाग आहे. संघटना म्हणून रा. स्व. संघाच्या प्रक्रियेचा तो भाग आहे.
    मात्र तमिळनाडूतील द्रमुक सरकारला असे संचलन निघावे, हे पचनी पडले नाही. सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. संघाचे संचलन होणार होते २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिनी. त्यासाठी चेन्नईसह ५० ठिकाणी संचलनाचे नियोजन संघाने केले होते. त्यासाठी रीतसर पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. मात्र त्याच दिवशी चिरुत्तैगल विडुदलै कट्चि या पक्षाकडून मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले असल्याने कायदा-सुव्यवस्था प्रश्नाचे कारण देऊन ती परवानगी नाकारण्यात आली. यावर आधी मद्रास उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात खटलेबाजी होऊन संचलन व्हावे, असा निकाल दिला. त्यानंतर पथ संचलन अखेर रविवारी झाले. त्यासाठी पोलिसांनी १२ अटी घातल्या होत्या. त्यांचे पालन संघाने केले.

    स्वयंसेवकांचा मोठा प्रतिसाद

    राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये निघालेल्या संचलनाला जो प्रतिसाद लाभला उत्स्फूर्त होता. त्याची छायाचित्रे आणि दृश्यफिती सर्वत्र फिरत आहेत. एकट्या चेन्नईत कोरट्टूरमध्ये झालेल्या संचलनात पेरांबूर, तिरुवोट्टीयुर, अमपाथूर आणि वडपळनी भागांतील 1,200 हून अधिक स्वयंसेवक गणवेशात सहभागी झाले होते. दक्षिण तमिळनाडूत हा आकडा १२,३०६ आणि उत्तर तमिळनाडू प्रांतात ८,२२३ होता. याचा अर्थ दोन्ही प्रांत मिळून २० हजार ५२९ स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. दोन्ही प्रांतात मिळून संचलनाला उपस्थित राहिलेल्या सामान्य लोकांची संख्या ३३ हजार ७४८ असल्याची माहिती आहे. माध्यमांनीही त्याला ठळक प्रसिद्धी दिली. यात द्रमुकच्या ‘दिनकरन’सारख्या वृत्तपत्र किंवा वाहिन्यांचा अपवाद होता, तरीही संघाला याचा फरक पडला नाही. एरवी दुर्लक्षित राहणारे संघांचे संचलन केवळ सरकारी अडथळ्यामुळे गाजले आणि त्याला सर्वदूर प्रसिद्धी मिळाली.

    हिंदू मक्कल काट्ची

    द्रमूक सरकारने यापूर्वी हिंदू मक्कल काट्ची तमिळगम या संघटनेलाही राज्यस्तरीय संमेलनाची परवानगी नाकारली होती. त्यासाठीही तेच कायदा – सुव्यवस्थेचे कारण दिले होते. त्याही संघटनेला मद्रास उच्च न्यायालयाने 29 जानेवारी 2023 ला राज्यस्तरीय संमेलन घेण्याची परवानगी दिली होती. तेव्हा द्रमूक सरकारने न्यायालयाची चपराक खाल्ली होती. पण त्यातून सरकार सुधारले नाही. उलट त्यानंतर संघाच्या पथ संचलनात अडथळा आणला आणि सर्वोच्च न्यायालयाची मुक्की खाऊन संचलनाला परवानगी दिली. या प्रकरणात द्रमूक सरकारची पुरती नाचक्की झाली.

    Route March by RSS Swayamsevaks in Chennai, Tamil Nadu.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य