विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील गर्भश्रीमंत मंडळींनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन बड्या शहरांमधून स्थलांतर केले आहे तर काहीजण या संकटाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आधार बनले आहेत.Rich businessman doing work from home
कोरोनाच्या या संसर्गाचा मोठा फटका मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांना बसला आहे. आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणारे मुकेश अंबानी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत गुजरातमधील जामनगरला गेले आहेत.
जामनगरमध्ये अंबानी यांचा मोठा बंगला आहे. तेथेच सध्या सारे कुटुंब वास्तव्याला आहे. पुढील काही दिवस तरी अंबानी कुटुंब मुंबईमध्ये परतण्याची शक्यता नसल्याचे बोलले जाते. जामनगरमधून मुकेश अंबानी देशभर ऑक्सीजन पुरवठा करण्याकडे स्वतः लक्ष देत आहेत.
आणखी एक गर्भश्रीमंत उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचे पुत्र करण आणि कुटुंबीयाने अहमदाबाद शहराबाहेर असलेल्या बंगल्यात आश्रय घेतला आहे. तर इन्फोसिसचे संस्थापक सदस्य असणाऱ्या क्रिस गोपालकृष्णन यांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतले आहे.
गोपालकृष्णन यांच्या कुटुंबीयांनी बाहेरशी असणारा संबंध पूर्णपणे तोडून टाकला असून आता घरामध्ये तयार होतील तेवढेच पदार्थ ते खातात.
‘इन्फोसिस’चे अन्य एक संस्थापक नंदन निलेकणी यांनीही तोच कित्ता गिरवला असून सध्या त्यांचेही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. बंगळूरच्या घरातून ते काम पाहतात.