• Download App
    वायनाडमध्ये राहुल गांधींच्या अपात्रतेवर जनतेला ना खंत ना खेद, काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे विरोध ठरला निष्प्रभ|Rahul Gandhi Disqualification What Waynad People Thinks Report

    वायनाडमध्ये राहुल गांधींच्या अपात्रतेवर जनतेला ना खंत ना खेद, काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे विरोध ठरला निष्प्रभ

    प्रतिनिधी

    वायनाड : लोकसभा खासदार म्हणून राहुल गांधी यांच्या अपात्रतेविरोधात काँग्रेस देशभरात रान उठवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ज्या वायनाड मतदारसंघाचे राहुल गांधी खासदार होते, तेथील मतदारांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न विविध माध्यमांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यावर वायनाडच्या जनतेने ना खेद ना खंत व्यक्त केला आहे. इकडे नवी दिल्लीत देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू आहे, पण केरळच्या कलपेट्टामध्ये रविवारी केवळ 50 काँग्रेसी कार्यकर्ते महात्मा गांधीच्या एका फोटोसह आंदोलन करताना दिसले.Rahul Gandhi Disqualification What Waynad People Thinks Report

    इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, ही मंडळी वायनाड जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर एका फुटपाथवर खुर्च्या टाकून निषेधाला बसली होती. जवळच एक बस स्टॉप आहे, जेथे प्रवाशांची ये-जा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकापाठोपाठ दिले जाणारे भाषण ऐकण्यासाठी क्वचितच एखादा प्रवासी थांबत होता. संध्याकाळी 4 वाजता तर सत्याग्रह संपत असताना त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांपेक्षा रिकाम्या खुर्च्यांची संख्या जास्त होती.



    राहुल गांधींच्या अपात्रतेच्या तीन दिवसांनंतरही त्यांच्या वायनाड मतदारसंघात काही तुरळक निदर्शनांशिवाय लोकांमध्ये रोष तयार करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. हा डोंगराळ मतदारसंघ प्रामुख्याने शेतीआधारित आहे. राज्याच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांपैकी कुणीही स्थानिक पातळीवर विरोधाला चालना देण्यासाठी आतापर्यंत वायनाडचा दौराही केलेला नाही.

    एवढेच नाही तर राहुल गांधींना अपात्र ठरवल्यानंतर त्यांना समर्थन असल्याचे कोणतेही बॅनर कलपेट्टा वा आसपासच्या गावात दिसले नाही. तेथे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचे काही जुने होर्डिंग्ज मात्र होते.

    येथे राहुल गांधींच्या अपात्रतेपेक्षा स्थानक अभिनेता इनोसेंट यांच्या मृत्यूवर जास्त चर्चा आहे. राहुल गांधींचा मुद्दा येथील ग्रामीण भागातून गायब झालेला आहे, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

    रिपोर्टनुसार, वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार एनडी अप्पाचन सांगतात की, “आम्ही विरोधाच्या अहिंसक पद्धतीवर कायम आहोत. मागचे तीन दिवस आम्ही कलपेट्टामध्ये विरोध प्रदर्शन केले होते. विरोधासाठी आम्ही केवळ गांधीवादी पद्धतीवर विश्वास ठेवतो. पक्षाकडे सुरत न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा कायदेशीर पर्याय आहे. वायनाडमध्ये आम्ही हिंसक आंदोलन करू अशी अपेक्षा कोणीही करू नये. पक्षाकडे कायद्यानुसार दाद मागण्याचा पर्याय आहे.”

    दुसरीकडे, कलपेट्टाच्या रस्त्यांवर राहुल गांधींच्या अपात्रेविरोधात सुरू असलेल्या काँग्रेसच्या निषेध आंदोलनात शुक्रवारी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी) च्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झालेली दिसली. येथील सदस्य पीपी अली आणि यूथ काँग्रेसचे जिल्हा सचिव साली रट्टाकोली आणि त्यांच्या समर्थंकामध्ये संघर्ष झाला. हा संघर्ष आंदोलनस्थळी सर्वात पुढच्या रांगेतील खुर्च्या मिळण्यावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नेत्यांची ही धक्काबुक्की वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर झाली.

    वायनाड काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. अनेक स्थानिक नेते तर आंदोलनापासून दूरच राहिले. राज्य युवा काँग्रेसला आपल्या रविवारी रात्रीच्या आंदोलनासाठी वायनाडच्या बाहेरून कार्यकर्ते गोळा करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

    रिपोर्टनुसार, मुत्तिल परिसरातत मागच्या 15 वर्षांपासून ऑटोरिक्शा चालवणारे सुरेश सांगतात की, ”येथील लोक राहुल गांधींच्या अपात्रतेमुळे जास्त चिंतित नाहीत. त्यांना वाटते की, राहुल यांना वरच्या कोर्टातून दिलासा मिळेल. काही काँग्रेसी आंदोलन करत आहेत. प्रत्यक्षात लोकांना इंटरेस्ट नाही. येथे आर्थिक संकटामुळे बंद पडलेली दुकाने पाहा, लोकांकडे पैसा नाही. संकट एवढे गहिरे आहे की, आम्हा लोकांना फक्त आमच्या दैनंदिन उपजीविकेचीच जास्त चिंता आहे.”

    रिपोर्टनुसार, भाजपा सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, येथील पक्ष राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केला हे जाहीर करण्यासाठी अभियान राबवण्याबाबत योजना तयार करत आहे. वायनाडमध्ये हिंदू मागास एझावा समाजाचा एक मोठा वर्ग आहे, जो बीडीजेएसचा मुख्य आधार आहे. यामुळे हे अभियान सूरत कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर यशस्वी होईल अशी स्थानिक भाजप नेत्यांना अपेक्षा आहे.

    Rahul Gandhi Disqualification What Waynad People Thinks Report

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य