• Download App
    पूर्ण राजकीय इव्हेंट करून राहुल गांधींनी सोडला घराचा ताबा; गिरवला आजीचा कित्ता!!|Rahul Gandhi copied his grandmother indira Gandhi while leaving his official benglow in Delhi

    पूर्ण राजकीय इव्हेंट करून राहुल गांधींनी सोडला घराचा ताबा; गिरवला आजीचा कित्ता!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पूर्ण राजकीय इव्हेंट करून राहुल गांधींनी सोडला घराचा ताबा आणि गिरवला आपल्या आजीचा कित्ता!!, हे राजधानी नवी दिल्लीत आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घडले आहे.Rahul Gandhi copied his grandmother indira Gandhi while leaving his official benglow in Delhi

    अक्षय तृतीयेचा मुहूर्त वास्तविक कुठल्याही शुभारंभासाठी साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त मानण्यात येतो. त्यामुळे गृहप्रवेश, वास्तुशांती, सुवर्ण खरेदी यासाठी हा उत्तम मुहूर्त असल्याची सनातन धर्मात अधिमान्यता आहे.

    मात्र या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राहुल गांधींनी आणखी एक राजकीय हौतात्म्य पत्करत नवी दिल्लीतील तुघलक मार्गावरील खासदार म्हणून मिळालेल्या आपल्या बंगल्याचा ताबा सोडून तो सरकारच्या ताब्यात दिला. यासाठी काँग्रेसने विशेषतः गांधी परिवाराने पूर्ण राजकीय इव्हेंट केला. राहुल गांधींच्या बंगल्यातले फर्निचर हलवून ते 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. स्वतः राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधींनी तुघलक लेन बंगल्यात उपस्थित राहून हे फर्निचर 10 जनपथ या घरी पाठविले. त्यावेळी संपूर्ण मीडिया तिथे कॅमेऱ्यांसह उपस्थित ठेवला आणि काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या सगळ्या इव्हेंटचे व्हिडिओ शेअर केले. आपण सत्य बोलल्यामुळे आपल्याला घर सोडावे लागले आहे, असे राहुल गांधींनी मीडियाला सांगितले.

    संपूर्ण घर खाली केल्यानंतर राहुल गांधी स्वतः घराला कुलूप लावत आहेत आणि ती किल्ली संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देत आहेत, या राजकीय इव्हेंटचे खास फोटोशूट करण्यात आले. राहुल गांधींनी घरातून बाहेर पडताना आपल्या स्टाफची भेट घेतली. प्रत्येकाशी हस्तांदोलन करत त्यांचे आभार मानले. त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला. या सर्व ठिकाणी त्यांच्या समवेत स्वतः सोनिया गांधी, प्रियांका गांधी हे दोघीही हजर होत्या.

    इंदिराजींच्या अटकेचे राजकीय नाटक

    राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडण्याचा इव्हेंट आणि इंदिरा गांधींना जनता पक्षाच्या राजवटीत अटक झाल्याचा इव्हेंट यात विलक्षण साम्य दिसते. जनता पक्षाच्या राजवटीत तत्कालीन गृहमंत्री चरण सिंग यांनी इंदिरा गांधींना आणीबाणीतील अत्याचाराच्या आरोपावरून अटक केली होती. मात्र या अटकेची प्रक्रिया इंदिरा गांधींनी त्या काळात दुर्मिळ असलेल्या राजकीय इव्हेंट मध्ये परिवर्तित करून दाखविली होती. पत्रकार जनार्दन ठाकूर त्यांनी तो इव्हेंट कव्हर केला होता.

    इंदिरा गांधींना अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस आणि सीबीआयचे काही अधिकारी यांची फौज 1 सफदरजंग मार्ग या बंगल्यावर आली होती. परंतु इंदिरा गांधींनी सुरुवातीला त्यांची दखलच घेतली नाही. तब्बल 3.00 तास अधिकाऱ्यांना लाऊंजमध्ये बसवून ठेवले. नंतर त्या बाहेर आल्या आणि एका खुर्चीवर बसल्या. तेथे मोठ्याने आरोपपत्र वाचायला लागल्या. दरम्यानच्या काळात इंदिरा समर्थकांनी प्रिंट मीडियातल्या सगळ्या पत्रकारांना तिथे बोलवून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर आरोपपत्राचे वाचन झाले.

    त्या वाचनानंतर इंदिरा गांधी तयार व्हायला परत आत मध्ये गेल्या आणि सुमारे अडीच – तीन तासांनी बाहेर येऊन अधिकाऱ्यांना मला बेड्या घालून बाहेर न्या, असे सांगू लागल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांची पुरती गोची झाली. त्यांनी इंदिरा गांधींना अटक करून न्यायालयात हजर जरूर केले, पण न्यायालयाने तासाभरातच इंदिरा गांधींना जामीन देऊन मोकळे केले.

    इंदिराजींना फायदा, जनता पक्षाला तोटा

    पण इंदिरा गांधींच्या अटकेचा हा राजकीय इव्हेंट तोपर्यंत देशा – परदेशातही पोहोचला होता. या अटकेचा राजकीय फायदा इंदिरा गांधींना नंतर झाला, तर तोटा त्या वेळच्या जनता पक्षाला सहन करावा लागला होता. गृहमंत्री चरण सिंग यांनी इंदिरा गांधींच्या अटकेचे मिस हॅण्डलिंग केले असा ठपका जनता पक्षाच्या मोरारजी देसाई सरकार मधील बाकीच्या मंत्र्यांनी ठेवला.

    राजकीय इव्हेंट मधला फरक

    इंदिरा गांधींनी त्यावेळी जी राजकीय चतुराई दाखवली होती, तशी चतुराई दाखवण्याचा प्रयत्न त्यांचे नातू राहुल गांधींनी दिल्लीतला तुघलक लेन मधला बंगला सोडताना करण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी आपल्या आजीची कॉपी जरूर केली आहे, पण आजीला अटकेचा जो राजकीय लाभ जनता पक्षाच्या गलथानपणामुळे मिळाला तसाच्या तसा लाभ राहुल गांधींना मिळण्याची जरी अपेक्षा असली तरी मोदी सरकारने तेवढ्या गलथानपणे राहुल गांधींचा इव्हेंट हाताळला आहे, असे कोणाचेही राजकीय निरीक्षण नाही. त्यामुळे खरंच या घर सोडण्याच्या राजकीय इव्हेंटचा राहुल गांधींना कितपत लाभ होईल?, याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त करण्यात येत आहे.

    Rahul Gandhi copied his grandmother indira Gandhi while leaving his official benglow in Delhi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य