विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी चारसो पार असा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात भाजप 250 च्या टप्प्यात आटोपेल, पण देशाच्या आर्थिक धोरणाची गती मात्र थांबणार नाही ती तशीच पुढे जात राहील, असे भाकीत रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केले. Raghuram rajan says modi led bjp win or loss in in lok sabha election it wont impact economic policy
रघुराम राजन हे नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचे टीकाकार आणि राहुल गांधींचे समर्थक मानले जातात. राहुल गांधींचे नेतृत्व प्रगल्भ होत चालल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रघुराम राजन म्हणाले :
भाजपा केवळ २०० ते २५० जागाच जिंकेल. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनोत अथवा न बनोत, भारत आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील. या निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या आर्थिक धोरणांवर काहीच परिणाम होणार नाही.
भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये सातत्य आहे. भारतात जे सरकार येईल ते त्यांच्याबरोबर काही नव्या गोष्टी घेऊन येईल. तसेच नवं सरकार लवकरच अर्थसंकल्पाची घोषणा करू शकतं. स्थगित असलेली शासकीय कामं आता पुन्हा सुरू होतील. नवं सरकार कोणत्या नव्या गोष्टी करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मोदी सरकारने यापूर्वी देशातील पायाभूत सुविधांकडे लक्ष देणं आवश्यक होतं. मोदींच्या सरकारने यासाठी देशाच्या तिजोरीतून पैसे काढायला हवे होते, खर्च करायला हवे होते. त्यामुळे नव्या सरकारला यावर लक्ष द्यावं लागेल, यासह पायाभूत सुविधांच्या दर्जाकडेही पाहावं लागेल. तसेच याचा फायदा केवळ मोठ्या कंपन्यांनाच न मिळता लहान कंपन्या आणि छोट्या व्यापाऱ्यांनाही मिळाले पाहिजे.
मी राजकारणात येऊ नये असं माझ्या कुटुंबातील लोकांना वाटतं. राजकारणात येण्यापेक्षा मला शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करायला मला आवडेल. मी याआधीही वारंवार सांगितलं आहे. परंतु, लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी स्वतःही राजकारणात येऊ इच्छित नाही. मी सरकारमध्ये आहे किंवा नाही याची मला पर्वा नाही. मात्र, सरकारच्या आर्थिक धोरणांवर मी बोलत राहतो आणि हाच माझा प्रयत्न यापुढेही असेल.