वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षांची निवड होऊन जाऊ द्यात त्यानंतर विरोधी ऐक्याबद्दल बोलता येईल, असा शब्द काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्याचे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी त्यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांना सांगितले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह लालूप्रसाद यादव यांनी सोनिया गांधींची 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. या तीनही नेत्यांमध्ये विरोधी ऐक्यावर चर्चा झाली. Promotion of opposition unity after election of Congress president
सध्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ती संपल्यानंतर दहा-पंधरा दिवसांनी परत एकदा भेटायला या, असे निमंत्रण सोनिया गांधी यांनी दिल्याचे लालूप्रसाद यादव सांगितले. लालूप्रसाद यादव यांच्या या वक्तव्याला नितीश कुमार यांनीही दुजोरा दिला. सध्या विरोधी पक्षांचा भर केंद्रातून भाजप सरकार हटविण्यावर आहे. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव या दोन्ही नेत्यांनी सांगितले.
विरोधी ऐक्याच्या रॅलीत 7 पक्षांचे नेते
या भेटीपूर्वी नितीश कुमार यांनी हरियाणातील फतेहाबाद येथे चौधरी देवीलाल यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त 7 विरोधी पक्षांच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला. मात्र त्या रॅलीमध्ये काँग्रेसला निमंत्रण नव्हते. देवीलाल यांचे सुपुत्र आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष ओम प्रकाश चौटाला यांनी ही रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये नितेश कुमार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आदी नेते उपस्थित होते.
मात्र या रॅलीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे नेते, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित नव्हते. हे सर्व नेते विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठीच यापूर्वी एकमेकांना भेटलेले आहेत. परंतु आज फतेहाबाद मध्ये झालेल्या विरोधी ऐक्याच्या पहिल्या सार्वजनिक रॅलीत त्यांचा सहभाग नव्हता.