पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी आणि प्रगल्भ नेत्याला नेमकं झालंय काय??, ते एकदम सुशीलकुमार शिंदे + पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांच्या रांगेत जाऊन का बसलेत??, असा सवाल पृथ्वीराज बाबांच्या वक्तव्यामुळे समोर आला. Prithviraj Chavan
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पृथ्वीराज बाबा एकदम सनातन धर्मावर आणि हिंदुत्वावर घसरले. मालेगाव मधल्या बॉम्बस्फोटाच्या मागे हिंदू दहशतवादी होते असे म्हणायचे नसेल, तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवादी होते, असे म्हणावे, असे पृथ्वीराज बाबा म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या टिळक भवनावर हल्लाबोल आंदोलन केले.
पृथ्वीराज बाबांचे वक्तव्य आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आंदोलन यातला राजकीय भाग सोडला तरी मूळात पृथ्वीराज बाबा यांच्यासारख्या मुरब्बी आणि प्रगल्भ नेत्याला नेमकं काय झालंय??, ते स्वतःहून चुकीचे वक्तव्य करून दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांच्या रांगेत जाऊन का बसले??, या सवालाचे उत्तर त्यांना कुणीही विचारले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करणारेच पुन्हा वक्तव्य केले. वास्तविक सोनिया गांधींना खुश करण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंनी हिंदू दहशतवादाची पुडी राजकीय हवेत सोडली. तिला दिग्विजय सिंह आणि चिदंबरम यांनी हवा दिली, त्यावेळी पृथ्वीराज बाबांनी हिंदू दहशतवादाच्या संकल्पनेला उचलून धरल्याच्या बातम्या आल्या नव्हत्या. त्यांनी त्यावेळी त्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचेही कुठे छापून आले नव्हते. मग आत्ताच असे काय झाले की पृथ्वीराज बाबांचे राजकीय संतुलन ढळले??
– काँग्रेस मधला विवेक बुद्धीचा आवाज
वास्तविक पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसमधल्या विवेक बुद्धीचा आवाज होते आणि आहेत. ते g23 गटाचे नेते होते आणि आहेत. ज्या g23 गटाने काँग्रेसच्या पराभवानंतर गांधी परिवाराला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता आणि त्या आत्मपरीक्षणा नुसार काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करायचाही सल्ला दिला होता. गांधी परिवाराने तो सल्ला अंशतः मानला. पण सल्ला देणाऱ्या सल्लागारांना हाताचे अंतर वाढवून ठेवले.
– शरद पवारांना जेरीस आणणारे नेते
पण त्याही पलीकडे जाऊन पृथ्वीराज बाबांचे राजकीय कर्तृत्व केवळ गांधी परिवाराला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्यापुरते मर्यादित नव्हते आणि नाही. ते केंद्रीय राजकारणात मुरलेले नेते आहेत. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सहा वर्षे त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे त्यानंतर केवळ सोनिया गांधींनी पाठवले म्हणून ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले, पण त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने शरद पवार यांच्यासारख्या महामुरब्बी नेत्याला जेरीस आणले होते. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का??, असा खालच्या स्तरावरचा सवाल विचारायची वेळ पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावर आणली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय कारकीर्दीत अतिशय तोलून मापून वक्तव्ये केली. उगाचच कुठल्या वादात पडायचे नाही. आपल्या भूमिकेवर शांतपणे ठाम राहायचे हे पृथ्वीराज बाबांचे राजकीय कौशल्य होते आणि आहे. पण नेमके मालेगाव स्फोटाच्या बाबतीतच असे काय झाले??, की पृथ्वीराज बाबांचे राजकीय वक्तव्य करण्याचे संतुलन ढळले??, हे कळायला मार्ग नाही.
…की राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगावर केलेल्या मतदान चोरीच्या आरोपांच्या संदर्भात चौकशी आणि तपास समिती नेमून तिचे अध्यक्ष पद पृथ्वीराज बाबांना दिले म्हणून त्यांच्यात असा अचानक बदल झाला??, हे समजायला मार्ग नाही. पण ते काहीही असो पृथ्वीराज बाबांचे सनातन आणि हिंदुत्ववादी दहशतवादाच्या संदर्भातले वक्तव्य राजकीय दृष्ट्या चुकीचे आहे. त्यांच्यासारख्या मुरब्बी आणि प्रगल्भ नेत्याकडून असे अपरिपक्व आणि खोटे वक्तव्य अपेक्षित नाही.
Prithviraj Chavan immature statement over Sanatan and hindutvvadi terrorism
महत्वाच्या बातम्या
- रामकुंडावर गोदावरी आरती आणि समरसता संध्या संपन्न; शीख समाजाच्या घोषणांनी दुमदुमला रामघाट!!
- श्यामची आई 71 वर्षांनंतरही दिल्लीत सुपरहिट; राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!
- Kolkata : कोलकातात बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी मॉडेलला अटक; व्हिसाशिवाय आली होती, आधार, मतदारसह रेशन कार्ड बनवले
- India iPhones : 25% टॅरिफचा भारतातील आयफोन उत्पादनावर परिणाम नाही; स्मार्टफोन्सना सूट; अमेरिकेत विकले जाणारे 78% आयफोन मेड इन इंडिया