विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कथितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. त्याच्या निषेधार्थ संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भाजपच्या दोन खासदारांना धक्का दिला. तो एवढा जोराचा होता की, खासदार मुकेश रजपूत आणि खासदार प्रताप सरंगी हे संसदेच्या पायऱ्यांवरून पडले आणि जखमी झाले.
खासदार मुकेश राजपूत यांना गंभीर जखम झाली असून त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. खासदार प्रताप चंद्र सरंगी यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांनाही त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमित शाह यांनी राज्यसभेतील संविधान चर्चेदरम्यान घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसने कालपासून सुरू केला. आज संसदेसमोर काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार निदर्शने केली. या निदर्शनासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निळी ड्रेपरी घालून आले होते. राहुल गांधींनी निळा टी-शर्ट घातला होता, तर प्रियंका गांधी यांनी निळी साडी नेसली होती. या सगळ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातात घेऊन संसदेच्या आवारात निदर्शने केली.
या निदर्शनादरम्यानच राहुल गांधींचे धसमुसळे वर्तन समोर आले. त्यांनी भाजपच्या दोन खासदारांना संसदेच्या पायऱ्यांवर धक्का दिला. तो एवढा जोराचा होता की खासदार मुकेश रजपूत आणि खासदार प्रतापचंद्र सरंगी संसदेच्या पायऱ्यांवरून खाली पडले आणि जखमी झाले. त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.