भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाला काश्मीरींचा वाढता पाठिंबा पाहायला मिळतोय; सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – जम्मू – काश्मीरबाबत सर्व पक्षीय नेत्यांची मते ऐकून घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत आपले विचार मांडले. मोदी म्हणाले की, जम्मू – काश्मीरमध्ये भ्रष्टाचार मुक्त शासनाला सुरूवात झाल्यानंतर काश्मीरी जनतेचा प्रशासनाला प्रतिसाद वाढायला लागला. राज्यात हे सहकार्य वाढल्याचे दृश्य स्वरूपात पाहायला मिळाले. हे समाधानकारक आहे.
राज्यामधील सर्व घटकांमध्ये आशेचा नवा किरण जागला आहे. केंद्राच्या अनेक योजना तेथे लागू झाल्यात. त्याचा लाभ लाखो लोकांना मिळायला लागल्याने जनतेचा विश्वास वाढतो आहे. विकासकामांमध्ये स्थानिक युवक आणि महिलांचा वाढता सहभाग सरकारला देखील प्रोत्साहन देणारा ठरला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
सर्व पक्षांनी देशातल्या घटनात्मक प्रक्रियेबद्दल आस्था दाखविली. लोकशाही प्रक्रिया राज्यात सुरू करण्याची मागणी केली. याविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. राज्यामध्ये लोकशाही व्यवस्था तळागाळापर्यंत रूजली पाहिजे. राज्यातल्या प्रत्येक घटकाला त्यात सहभाग मिळाला पाहिजे. यावर पंतप्रधानांनी भर दिला. केंद्र सरकार जम्मू – काश्मीरमधल्या वंचित घटकांच्या विकासासाठी अविरत कार्य करीत राहील, असा विश्वासही पंतप्रधानांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिला.
- पंतप्रधानांच्या भाषणातले बिटविन द लाइन्स
- जम्मू – काश्मीरचे राजकारण हे आत्तापर्यंत राजकीय घराण्यांपुरतेच सीमित राहिले आहे. ते सोडवून राजकीय प्रक्रियेत सर्व घटकांना केंद्र सरकार सामावून घेणार आहे.
- भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा आवर्जून उल्लेख पंतप्रधानांनी करणे याचा अंगुली निर्देश राजकीय घराण्यांनी तयार केलेल्या इको सिस्टिमकडेच होता. विशिष्ट घराण्यांमध्ये सत्ता एकवटल्याने भ्रष्टाचार वाढल्याचेच पंतप्रधानांनी यातून स्पष्ट सूचित केले.
- भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही नुसती निवडणूकीच्या भाषणातली घोषणा न राहता ती काश्मीरसाठी गांभीर्याने घेतलेल्या बैठकीतल्या अजेंड्यावर आणली हे पंतप्रधानांच्या भाषणाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते.