विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोविडचा धोका अजून टळलेला नाही. उलट काही राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटने रूग्णसंख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील सहभागी होणार आहेत. PM Narendra modi to discuss covid 19 situtation in six states including maharashtra, CM uddhav thackeray will participate
या बैठकीमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसामधील लसीकरणासंदर्भातील आणि कोरोना आकडेवारीसंदर्भात चर्चा होणार आहे. केरळ वगळता या सहा राज्यांपैकी पाच राज्यांमध्ये देशातील एकूण करोना रुग्णसंख्येपैकी ७३.४ टक्के रुग्ण आहेत. १३ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशामध्ये एकूण ५५ असे जिल्हे आहेत जिथे करोना चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांहून अधिक होता.
ज्या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यापैकी महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. कोरोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. मागील मंगळवारी पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.
मागील काही दिवसांपासून या सहा राज्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारे आणि बाजारांमध्येही मास्क न घालताच फिरणाऱ्या लोकांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच मोदींनी मायक्रो कंनटेन्मेंट झोनवरही जोर दिला. मोदींनी गुरुवारी वाराणसीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये बेजबाबदारपणा घातक ठरु शकतो, असा इशारा दिला.