वृत्तसंस्था
नवी दिल्ली – तामिळनाडूतील विकास कामांबाबत राज्य विधानसभेत प्रथमच पोहोचलेल्या भाजपच्या ४ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी येऊन चर्चा केली. पंतप्रधानांनी आपल्या व्यग्र कार्यक्रमातून या ४ आमदारांना भेटीसाठी वेळ दिला होता. PM Narendra Modi interacted with BJP Tamil Nadu president Dr L Murugan & Party MLAs from state- Nainar Nagenthran, Vanathi Srinivasan, MR Gandhi & Ck Saraswathi.
भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष डॉ. एल. मुरूगन यांच्यासमवेत तामिळनाडू विधानसभेतील भाजपचे ४ आमदार नयनार नागेंद्रन, वनाथी श्रीनिवासन, एम. आर. गांधी, सी. के. सरस्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या सर्व लोकप्रतिनिधींनी तामिळनाडूच्या विकास योजनांसंबंधी आपले विचार शेअर केले. त्यांच्या भविष्यकालीन योजनांना माझ्या शुभेच्छा असे ट्विट पंतप्रधान मोदींनी या भेटीनंतर केले आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले होते. निवडणूकीत जयललिता यांच्या अण्णा डीएमके पक्षाशी भाजपने युती केली होती. या युतीमध्ये भाजपच्या वाट्याला २० जागा लढविण्यासाठी आल्या होत्या. यापैकी ४ उमेदवार निवडून येऊन तामिळनाडू विधानसभेत पोहोचले आहेत.
या आमदारांपैकी वनाथी श्रीनिवासन यांच्याकडे भाजपच्या अखिल भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पंतप्रधानांनी आपल्या छोट्या गटाला भेटण्यासाठी वेळ देऊन तामिळनाडूच्या विकास कामांसंबंधी चर्चा केली याबद्दल वनाथी श्रीनिवासन आणि अन्य आमदारांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले आहेत.