विशेष प्रतिनिधी
नागपूर : देशाचे पंतप्रधान प्रथमच संघाच्या जन्मभूमीत हेडगेवार स्मृतीस्थळी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.
संघाचे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी यापूर्वी असंख्य वेळा नागपूरच्या हेडगेवार स्मृती आले. तिथे ते राहिले. परंतु, पंतप्रधान या नात्याने मोदी प्रथमच संघ स्थळावर आले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. हेडगेवार आणि गुरुजी यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पित करून मोदींनी त्यांना अभिवादन केले. पूजनीय हेडगेवार जी आणि पूजनीय गुरुजी यांना शतशत नमन. या स्मृती मंदिरात येऊन मी अभिभूत झालो. हे स्मृती मंदिर लाखो स्वयंसेवकांचे ऊर्जापुंज आहे. भारतीय संस्कृती, संघटना आणि राष्ट्रवाद यांना हे स्थळ समर्पित आहे. आमच्या प्रयत्नांनी भारत मातेचे वैभव सतत वाढत राहो, असे पंतप्रधान मोदींनी विजिटर्स बुक मध्ये नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संघ स्थळाच्या भेटीविषयी माध्यमांमध्ये खूप चर्चा रंगली. विविध राजकीय पक्षांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे संघ आणि भाजप यांचे तथाकथित आणलेले संबंध या चर्चेत ओढून आणले. मात्र ज्यांना संघांच्या कामाचे स्वरूप नेमकेपणाने माहिती आहे, जनसंघ आणि भाजपच्या निर्मितीमागे संघाची प्रेरणा कशी आहे, याविषयीचे ज्ञान आहे त्यांना मोदींच्या संघ स्थळाच्या भेटीविषयी कुठले आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया संघाचे स्वयंसेवक आणि अभ्यासक शेषाद्री चारी यांनी व्यक्त केली.