विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कतारने मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या 8 माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केली होती. या आठपैकी सात भारतीय नुकतेच मायदेशात परतले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोहा येथे पोहोचले आणि त्यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. PM Modi invites Emir of Qatar to visit India, says on release of 8 Indians…
यावेळी पंतप्रधान मोदींनी आठ माजी भारतीय नौसैनिकांच्या सुटकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन दिवसांच्या भेटीनंतर 14 फेब्रुवारीच्या रात्री पंतप्रधान मोदी कतारला पोहोचले. यानंतर 15 फेब्रुवारी रोजी कतारच्या रॉयल पॅलेसमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोदींनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद यांची भेट घेतली.
शेख तमीम बिन हमाद यांच्यासोबतची भेट उत्कृष्ट होती, असे मोदींनी सोशल मीडिया वेबसाइट एक्सवर पोस्ट केले. आम्ही भारत-कतार संबंधांचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदींची ही कतार भेट महत्त्वाची आहे कारण ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा नुकतेच कतारने भारताच्या 8 माजी नौसैनिकांची कैदेतून सुटका केली होती. या 8 खलाशांना ऑगस्ट 2022 मध्ये इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये कतार कोर्टाने सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, डिसेंबरमध्ये ‘कोर्ट ऑफ अपील’ने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांची नुकतीच सुटका झाली.
माजी सैनिकांच्या सुटकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेबद्दल पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांचे आभार मानले. भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींनी कतारचे अमीर थानी आणि त्यांचे वडील हमद बिन खलिफा अल थानी यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.
2016 मध्ये शेवटच्या वेळी कतारला गेले होते
पंतप्रधान मोदी यांनी शेवटचा 2016 मध्ये कतारला भेट दिली होती. कतारचे अमीर 2015 मध्ये भारतात आले होते. गेल्या वर्षी 2023 मध्ये भारत आणि कतार यांच्यातील पूर्ण राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कतारमधून 8 भारतीयांची सुटका हा देशाचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.
8 भारतीय खासगी कंपनीत काम करायचे
ऑगस्ट 2022 मध्ये, कतारच्या गुप्तचर संस्थेने दोहा येथे कथित हेरगिरीच्या प्रकरणात 8 भारतीय नागरिकांना अटक केली. हे सर्वजण दहरा ग्लोबल या खासगी कंपनीत काम करत होते. मात्र, कतार किंवा भारताने त्याच्यावर जाहीरपणे कोणतेही आरोप केलेले नाहीत. मात्र, कतारी अधिकाऱ्यांनी पाणबुडीवर हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 8 भारतीयांना तुरुंगात पाठवले. नोव्हेंबर 2023 मध्ये, भारत सरकारने कतारच्या उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते.