सेमी फायनल मध्ये चालली मोदींची गॅरंटी; INDI आघाडीत वाजली धोक्याची घंटी, त्यामुळे PDA आघाडीची जोरात तयारी, असे म्हणायची वेळ मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या निवडणूक निकालांनी आणली आहे!!
या 4 राज्यांमध्ये निकाल लागताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह अनेकांनी “मोदींची गॅरंटी चालली”, असे सूचक वक्तव्य करून या राज्यांच्या निवडणुकांमध्ये नेमके काय झाले??, हेच खरं म्हणजे स्पष्टपणे सांगितले. फक्त ते माध्यमांना “दिसले” नाही!!
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर जंग जंग पछाडले. मोफत वस्तूंचा आणि काँग्रेसच्या गॅरंटीचा जनतेवर भडीमार केला, पण प्रत्यक्षात यापैकी कुठलीच जादू चारही राज्यांमधल्या मतदारांवर चालली नाही. जी थोडीफार जादू चालली, ती फक्त तेलंगणात चालली!! पण तेथे देखील भाजपचा पराभव करण्याचा आनंद काँग्रेसला मिळाला नाही, तर काँग्रेसने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव करून तेलंगणात सत्ता मिळवली.
या पार्श्वभूमीवर, “मोदींची गॅरंटी चालली”, या वक्तव्याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे, काँग्रेसने मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी जाती-जातींमध्ये भेद करून जातनिहाय जनगणनेची मागणी कितीही रेटून लावून धरली, बीसी, ओबीसी हक्कांचा मुद्दा लावून धरला, तरी जनतेचा राहुल गांधींच्या शब्दांवर विश्वास नाही, तर मोदी जी प्रत्यक्ष कृती करतील त्यावर विश्वास आहे, हे मतदारांनी दाखवून दिले आहे.
राहुल गांधी प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक प्रचार सभेत ओबीसी मुद्दा लावून धरत होते. जातनिहाय जनगणनेवर जोर देत होते. भारताचा मतदार जातीजातींमध्ये विभागून आपला राजकीय हेतू साध्य करता येऊ शकेल आणि नरेंद्र मोदींचे सर्व समावेशक हिंदुत्वाचे आवाहन आपल्याला उद्ध्वस्त करता येईल, हा राहुल गांधींचा होरा होता. त्यासाठी देशातले डावे आणि अति डावे विचारवंत त्यांना बौद्धिक इंधनही पुरवत होते, पण त्या इंधनाचा भडका मतदारांनी प्रत्यक्षात काँग्रेसवरच उडवला.
फक्त राजस्थानात सत्ता परिवर्तन होण्याची अटकळ काँग्रेसने बांधली होती. तिला एक्झिट पोलने देखील दुजोरा दिला होता. तो एक्झिट पोल खरा ठरला, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधला एक्झिट पोल काँग्रेसच्या यशा इतकाच वाऱ्यावर उडाला. छत्तीसगडमध्ये मोठा उलटफेर झाला आणि मध्य प्रदेशात, तर भाजपने “गुजरात प्रयोग” यशस्वी करून दाखवला. सलग चौथ्यांदा सत्ता टिकवून दाखवली आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचे जादू किंवा गारुड उद्ध्वस्त करून टाकले. भाजपने बूथकेंद्रित राजकारण कसे यशस्वी होऊ शकते याचे उदाहरण सर्व राजकीय पक्षांपुढे पेश केले.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचे माध्यमनिर्मित चाणक्य भाकऱ्या फिरवण्याची भाषा वारंवार वापरतात, पण त्यांची भाकरी पूर्ण करपली, तरी भाषा बदलली नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपच्या प्रादेशिक नेत्यांनी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये अशा काही भाकऱ्या फिरवल्या, की त्यामुळे काँग्रेसची सत्ता तिथे उलथून पडली. सेमी फायनल मध्ये मोदींची गॅरंटी चालली. राहुलची गॅरंटी डस्टबिन मध्ये गेली. पण तेलंगणामध्ये भाजप ऐवजी भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव केल्याने काँग्रेसच्या गळ्यात नसते राजकीय झेंगट आले!!
काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीनुसार तेलंगणा विजयाचे सगळे श्रेय राहुल गांधींना आहे. या श्रेयाच्या खुशीची गाजरे तेलंगण मधले काँग्रेस नेते खात आहेत. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रेवंत रेड्डी यांच्या फोटोंना दुधाचा अभिषेक घातला आहे,हे सगळे ठीक आहे!!
पण काँग्रेसने तेलंगणात भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव केल्याने INDI आघाडीतल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे कान उभे राहिले. INDI आघाडीत राहून काँग्रेसचे आणि राहुल गांधींचेच वर्चस्व सहन करायचे, तर या आघाडीच राहायचेच कशाला??, असा रास्त सवाल त्यांना पडला आहे. त्याचे सूतोवाच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी आधीच करून ठेवले होते. स्वतः अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी INDI आघाडीतून बाहेर पडून PDA
अर्थात पिछडे, दलित, आदिवासी अशी PDA आघाडी करण्याची तयारी आधीपासूनच चालवली आहे. आता त्या तयारीला जबरदस्त वेग येण्याची शक्यता आहे.
तेलंगणातला विजय काँग्रेससाठी आज पेढे खाण्याचा आहे, पण तिथे भाजप ऐवजी प्रादेशिक पक्षाचा पराभव केल्यामुळे लोकसभा 2024 च्या फायनल लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिक मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागण्याची शक्यता आहे. “ही खरी मोदींची गॅरंटी आहे.”; INDI आघाडीत ही धोक्याची घंटी वाजली आहे!!
People or 4 states trusted Modi’s guarantee, big challenges ahead for INDI INDI alliance!!
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी