भारतातल्या आजकालच्या सगळ्याच समस्यांचे ओझे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्यावर टाकायची आजकालची “फॅशन” असताना प्रत्यक्षात नेहरू काळ नेहरूंचे राजकीय कर्तृत्व, प्रतिमा निर्मिती आणि त्याला कारणीभूत ठरलेली विरोधकांची अति तात्त्विक सुमार कामगिरी याचा आढावा पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीच्या दिवशी घेतला, तर तो वावगा ठरणार नाही. Pandit Nehru
पंडित नेहरूंचे स्वतंत्र भारताच्या निर्मिती योगदान सुरुवातीला वादातीत होते, पण नंतर टप्प्याटप्प्याने ते वादग्रस्त होत गेले. नेहरूननी भारताला दिलेले औद्योगिक धोरण, त्यांनी केलेले संस्था निर्मिती, पूर्ण दरिद्री अवस्थेतून भारताला विकसनशील देशाच्या पथावर आणून सोडणे ही त्यांची कामगिरी मान्य केलीच पाहिजे, पण त्याचवेळी त्यांच्या कमकुवत संरक्षण धोरणामुळे भारताचे अतोनात नुकसान झाले याचे पाप नेहरूंच्या शेरवानीच्या खिशात ठेवलेच पाहिजे.
पण आजकाल प्रत्येक समस्येचे मूळ नेहरूंच्या राजवटीत होते असे म्हणायचे आणि टीका करायची फॅशन झाली असताना प्रत्यक्षात ते तसे होते का आणि तसे असेल तर त्याला फक्त नेहरूच कारणीभूत होते का??, की अन्य कोणी त्याला तेवढेच कारणीभूत होते, याचा थोडा आढावा घेतला, तर त्यासाठी खुद्द नेहरूंच्याबरोबर त्यावेळचे विरोधकही कारणीभूत होते हे मान्य करावे लागेल.
नेहरूंचे जेवढे राजकीय कर्तृत्व होते, यापेक्षा त्यांची प्रतिमा निर्मिती मोठी होती. भारतीय समाजावर त्यांचे गारुड होते. नेहरूंची तशी प्रतिमा निर्मिती करण्यात खुद्द नेहरू आणि काँग्रेसच्या पेक्षा बरोबरीने त्यावेळच्या बुद्धिमान पण विस्कळीत असलेल्या विरोधी नेत्यांचा देखील तेवढाच हात होता. आज नेहरूंच्या कर्तृत्वाची आणि प्रतिमा निर्मितीची जशी चिकित्सा होते, तशी ती पूर्वी व्हायची नाही, आता ती अधिक कठोरपणे होते, पण त्याच वेळी त्यावेळच्या नेहरूंच्या विरोधकांच्या प्रतिमेची आणि कर्तृत्वाची तेवढी कठोरपणे चिकित्सा होत नाही, त्यामुळे नेहरूंचे कर्तृत्व आणि उणेपण जसे लोकांसमोर येते, तसे त्यावेळच्या विरोधकांचे कर्तृत्व आणि उणेपण आज लोकांसमोर येत नाही. किंबहुना आणले जात नाही.
स्वतः नेहरू लोकशाहीवादी नव्हते. ते लोकशाहीचा मुखवटा धारण करून होते, पण आतून ते लोकशाही विरोधी किंबहुना हुकूमशाहीवादीच होते असा आरोप करणे सोपे आहे, तसा तो त्यांना चिकटतही होता, पण नेहरूंचे लोकशाहीवादी नसण्याला त्या वेळचे विरोधकही कारणीभूत ठरले. नेहरुंची सगळ्या देशात प्रतिमा उत्तुंग होती, पण त्यांचे विरोधक श्यामाप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया, दीनदयाळ उपाध्याय यांची प्रतिमा देखील फार कमी नव्हती. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि राजकीय कर्तृत्वाच्या आधारे या नेत्यांची प्रतिमाही चांगली आणि उत्तुंगच होती, पण तरी देखील हे सगळे नेते नेहरूंसमोर निष्प्रभ ठरले. त्यावेळी तरी ते नेहरूंसमोर पर्यायी नेतृत्व करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल आणि याला कारणीभूत नेहरूंची हुकूमशाही ठरली हा आरोप अर्धसत्य ठरेल. कारण हे सगळे नेहरूंचे विरोधक कितीही बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असले, तरी ते अति तात्त्विक राजकारण करत होते. तसले राजकारण करताना आपल्या मधले अव्यवहार्य टोकाचे मतभेद बाजूला सारून ते एकत्र येत नव्हते.
– नेहरू सुरुवातीला सर्वसमावेशक
वास्तविक पहिले मंत्रिमंडळ बनवताना नेहरूंनी सर्वसमावेशकता दाखवली होती. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात हिंदू महासभेचे नेते शामाप्रसाद मुखर्जी आणि शेड्युल कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश केला होता. त्यावेळच्या कम्युनिस्ट नेत्यांशी देखील नेहरुंनी संवाद ठेवला होता. एक प्रकारे आघाडी सरकारची प्रस्थापना नेहरुंनी करून ते काही वर्षे चालवून देखील दाखविले होते. पण काही झाले तरी नेहरू पंतप्रधान होते. त्यामुळे सरकार चालविणे हे त्यांचे काम होते. आपल्या आणि काँग्रेसच्या विरोधकांची एकजूट करणे आणि ती टिकवून पर्यायी राजकारण उभे करणे, हे नेहरूंचे काम आणि जबाबदारी नव्हती. देशात लोकशाही टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष देखील मजबूत हवा हे बुद्धिमान विरोधकांना नेहरूंनी सांगणे अजिबात अपेक्षित नव्हते. ते त्यांचे त्यांनाच समजणे आणि त्यांनी तशी कृती करणे आवश्यक होते. पण नेहरूंच्या पेक्षा प्रकांड पंडित असणाऱ्या बुद्धिमान विरोधी नेत्यांना तसे केले नाही.
पंडित नेहरूंची उत्तुंग प्रतिमा आणि काँग्रेसची प्रचंड राजकीय ताकद भेदायची असेल, तर आपल्याला सर्व विरोधकांची एकजूट करावी लागेल. त्यासाठी आपापसात मधले अति तात्त्विक मतभेद विसरावे लागतील, नेहरू आणि काँग्रेस यांच्या विरोधातला एक किमान समान कार्यक्रम (common minimum program) तयार करून निवडणुकांना सामोरे जावे लागेल याचे भानच त्यावेळच्या बुद्धिमान विरोधी नेत्यांना नव्हते. ते आपापले तंबू आणि राहूट्या वेगवेगळ्या उभारूनच नेहरूंसारख्या उत्तुंग प्रतिमेच्या नेत्याशी टक्कर घेऊ पाहत होते.
– बुद्धिमान विरोधक विस्कळीत
एकीकडे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारखे जनसंघीय नेते होते. त्यांच्या दुसऱ्या फळीत बलराज मधोक आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते होते. त्याचवेळी समाजवादी पक्षामध्ये राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, आचार्य नरेंद्र देव, पटवर्धन बंधू यांच्यासारखे नेते होते. कम्युनिस्टांमध्ये कॉम्रेड डांगे बी. टी. रणदिवे हे नेते होते. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष प्रबळ होता. दक्षिणेत राजगोपालाचारी होते. पण या सगळ्यांची तोंडे मात्र एकमेकांच्या विरोधी दिशांना होती. जनसंघासारख्या पक्षाकडे संघाच्या संघटनेचे पाठबळ होते, पण संघाचे नेतृत्व गोळवलकर गुरुजींसारख्या राजकारणाचा अतिरिक्त तिटकारा असणाऱ्या नेत्याकडे होते. त्यामुळे गुरुजींचे “राजकारण नकोचे’ संस्कारच जनसंघीय नेत्यांमध्ये उतरले होते. संपूर्ण हिंदू समाजाची एकजूट हे संघाचे ध्येय होते, पण विरोधकांची एकजूट किंबहुना बलराज मधोक आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यातली राजकीय एकजूट सुद्धा गुरुजी प्रणित संघाचे नेते आपल्या कृतीतून साधू शकत नव्हते. शिवाय हिंदू महासभा आणि रामराज्य परिषद हे दोन हिंदुत्ववादी पक्ष आपापल्या वेगवेगळ्या तंबूंमधून अति तात्त्विक राजकारण करत होते. म्हणून हिंदुत्ववादी राजकारण पराभूत होत होते.
– समाजवादी बडबड अन् फाटाफूट
समाजवादी तत्त्वामध्ये तर फाटाफूटच अनुस्यूत होती. समाजवादी नेते जेवढे बडबड करीत, तेवढी त्यांच्या पक्षात फूट पडत राही. त्यामुळे समाजवादी चळवळ उभी राहण्यापूर्वीच तिला आडवी करण्यात समाजवादी नेत्यांनी आपली तत्त्वनिष्ठा वापरली.
त्यामुळे नेहरूंनी उभ्या केलेल्या बळकट काँग्रेस पक्षाच्या विरोधात सगळ्या विरोधकांची एकजूट करून तिची मोट बांधून एकत्र निवडणूक लढविण्यासाठी महाआघाडी तयार करायला सगळ्या विरोधकांना 1971 हे साल उलगडावे लागले. हे नेहरूंच्या आठव्या पुण्यतिथीचे वर्ष होते. त्यामुळे नेहरूंच्या कर्तृत्वापेक्षा यांची प्रतिमा निर्मिती मोठी होती हे त्यांचे यश मानले, तर ते विरोधकांचे दारूण अपयश मानावे लागेल. त्यासाठी विरोधकांचे अव्यवहार्य आणि अति तात्त्विक राजकारण कारणीभूत ठरले, हे सत्य स्वीकारावे लागेल.
Nehru’s political achievements, image creation and the very poor performance of the opposition!!
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं