विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बजेट 2025 कडून CII ची अपेक्षा, ग्रामीण भागात वाढवा नोकऱ्या!! अशा स्पष्ट शब्दात कन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री अर्थात (CII) चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. केंद्रीय बजेट संदर्भात झालेल्या बैठकीत यापूर्वीच CII ने केंद्र सरकारकडे रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी सात कलमी कार्यक्रम दिलाच होता. त्या पाठोपाठ उद्या सादर होणाऱ्या बजेटच्या आधी चंद्रजीत बॅनर्जी यांनी सरकारकडून ग्रामीण भागातल्या नोकऱ्या वाढवायची अपेक्षा व्यक्त केली.
आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी सरकारने यंत्रणा कार्यक्षम केली आहे. त्यात आधुनिकीकरण करून ती अधिक कार्यक्षम करावी, अशी अपेक्षा देखील बॅनर्जी यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर शहरी भागातली एकूण गर्दी, तिथले राहणीमान आणि महागाई या बाबी लक्षात घेता अर्थव्यवस्थेला अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामीण भागात नॉन एग्रीकल्चर क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची संधी वाढवावी, जेणेकरून ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर परिणामकारक रित्या रोखता येईल, असे बॅनर्जी म्हणाले.
ग्रामीण भागात नॉन अग्रिकल्चर उद्योग उभे राहणे हे आर्थिक दृष्ट्या देखील परवडणारे असेल. कारण उद्योगांसाठी तिथे उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा या शहरी पायाभूत सुविधांपेक्षा अधिक स्वस्त उपलब्ध होऊ शकतात याकडे देखील बॅनर्जी यांनी लक्ष वेधले.