वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. मात्र अजूनही देशभरात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क वापरत नसल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने दिली आहे. Oh my god Half of India does not use masks; Shocking information provided by the Central Government
दुसऱ्या लाटेत अनेकांचे मृत्यू झाले आहेत तसंच कोरोनाचा कहरही चांगलाच वाढलेला पाहण्यास मिळाला. या लाटेत आपल्या हाताशी लस आणि लसीकरण मोहीम आहे मात्र लसींचं उत्पादन कमी झाल्याने आणि केंद्र सरकारकडून पुरेसा पुरवठा न झाल्याने लसीकरण मोहिमेचा वेगही मंदावला आहे.
अशात मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे ही त्रिसूत्री पाळण्याचं आवाहन हे वारंवार केलं जातं आहे. पहिल्या लाटेतही ही त्रिसूत्री होतीच. अशात आता अर्धा भारत म्हणजेच भारतातले ५० टक्के लोक मास्क वापरतच नाहीत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे
एका सर्वेक्षणाच्या आधारे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकट गंभीर असताना देखील ५० टक्के लोक मास्कचा वापर करत नाहियेत. तसेच जे लोक मास्क वापरतात त्यापैकी ६४ टक्के लोक मास्कद्वारे नीट नाक झाकत नाहीत.
आरोग्य मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार, देशातील २५ शहरांमध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे ही माहिती समोर आली आहे. २० टक्के लोक आपला मास्क तोंडाच्या खाली ठेवतात. तर २ टक्के लोक मास्क मानेवर अडकवून ठेवतात. तसेच ५० टक्के मास्क वापरणाऱ्या लोकांपैकी फक्त १४ टक्के लोक असे आहेत की जे योग्यरित्या मास्क वापरत आहेत.
कोरोनाचं संकट गहीरं झाल्यापासून मास्क वापरणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मास्क लावणं हे आपल्याला कदाचित २०२२ मध्येही कायम ठेवावं लागेल असं काही दिवसांपूर्वी केंद्राच्या ऑक्सिजन टास्क फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनीही सांगितलं होतं. अशात आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अर्धा भारत मास्कच लावत नसल्याची माहिती दिली आहे आणि मास्क लावण्याचं आवाहनही केलं आहे.