विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तर भारतात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असताना आज हजारो नागरिक, साधू महंतांनी येथे शाही गंगा स्नान केले. कुंभमेळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहापर्यंत साधारणपणे १७.३१ लाख लोकांनी शाही स्नान केले होते.No social distancing followed in kumbh
हरिद्वार येथील ‘हर की पौडी’ आणि अन्य घाटांवर स्नान करताना कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बऱ्याच साधू महंतांनी मास्क न घालताच या शाही स्नानामध्ये भाग घेतला होता. विविध आखाड्यांच्या महामंडलेश्वीर साधूंच्या नेतृत्वाखाली शोभा यात्रा काढण्यात आल्याने सोशल डिस्टन्सिंगचे देखील कोठेही पालन झाले नाही.
आज सोमवती अमावस्या असल्याने विविध भागांतील नागरिकांनी शाही स्नानासाठी ‘हर की पौडी’, अन्य भागांमध्ये गर्दी केली होती. उत्तराखंड सरकारने या कुंभमेळ्यासाठी मोठी तयारी केली होती. आज मुख्य स्नानस्थळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.
शाही स्नानासाठी येथील ‘हर की पौडी’ हा घाट महत्त्वपूर्ण मानला जातो. आज सकाळी सातपासून विविध आखाड्यांचे साधू आणि महंतांनी या घाटाच्या दिशेने धाव घ्यायला सुरुवात केली होती. सामान्य नागरिकांसाठी अन्य घाटांवर स्नानाची सोय करण्यात आली होती.