नाशिक : दोन राष्ट्रीय पक्षांना भाकऱ्या फिरविण्यात यश; पण प्रादेशिक पक्षांची सत्तेत आणि विरोधातही धडपड आणि तडफड!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
– कर्नाटकात काँग्रेसने फिरविली भाकरी
काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांनी भाकऱ्या फिरवून आपापल्या पक्षांमधली राजकीय व्यवस्था अधिक मजबूत केली. कर्नाटक मध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागी डी. के. शिवकुमार यांची निवड करून कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार वाचविले. अन्यथा डी. के. शिवकुमार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखे बंड करून कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार धोक्यात आणले असते. पण काँग्रेसने वेळीच सिद्धरामय्या यांची भाकरी फिरवून काँग्रेस मधली फूट टाळली.
– भाजपने फिरविल्या चार भाकऱ्या
भाजपने आज एकाच दिवशी चार भाकऱ्या फिरवून पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि त्रिपुरा या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलून टाकले. पंजाब मध्ये केवल चरण सिंह ढिल्लो हरियाणात अर्चना गुप्ता आणि दिल्लीत हर्ष मल्होत्रा यांना प्रदेशाध्यक्ष केले. तहान लागली की विहीर खणायची असला प्रकार न करता भाजपने नवीन प्रदेशाध्यक्ष नेमून त्यांना आपापल्या राज्यांमध्ये भाजप संघटना बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, अशी व्यवस्था केली. त्याचबरोबर या नव्या नेत्यांवर राज्य जिंकण्याचीही जबाबदारी दिली.
पण त्याच वेळी वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मात्र सत्तेत आणि विरोधात सुद्धा तडफड आणि धडपड दिसली.
– ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये गदारोळ
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षातली भांडणे मोठ्या प्रमाणावर उफाळून आली. कोलकत्यामधल्या शंभर नगरसेवकांनी राजीनामे देऊन टाकले. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काकुली घोष यांच्यातले भांडण चव्हाट्यावर आले. ते थेट लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भर लोकसभेत आपल्याला शिव्या दिल्याची तक्रार खासदार काकूली घोष यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. त्यामुळे कल्याण बॅनर्जी यांचे लोकसभा सदस्यत्व धोक्यात आले.
पश्चिम बंगाल मधल्या पराभवाला “आयपॅक” नावाची संस्था जबाबदार असल्याचा आरोप आणि प्रत्यारोप या दोन्ही गोष्टींनी तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांना पछाडले. ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी एकमेकांवरच आरोप – प्रत्यारोप चालविले. ममता बॅनर्जींच्या पक्षात मोठा गदारोळ माजला.
पण केवळ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये हा गदारोळ माजला असे नाही, तर महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेची फळे चाखणाऱ्या दोन पक्षांमध्ये सुद्धा प्रचंड अस्वस्थता पसरलेली दिसली.
– शिंदे सेनेत अस्वस्थता
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक या दोन शहरांपैकी एका शहरातली विधान परिषदेची जागा गमवावी लागण्याची चिन्हे दिसली तिथे भाजपचे वर्चस्व वाढल्याने शिंदेंना त्याचा फटका बसल्याचे दिसून आले. पण तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कमी अस्वस्थता दिसली कारण शिवसेनेने संघटनात्मक बांधण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवून त्यांचे शंभर पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरे सुद्धा सुरू केले. त्यामुळे शिवसेनेतल्या अस्वस्थतेला संघटनात्मक बांधणीची तरी जोड मिळाली.
– राष्ट्रवादीची सत्तेसाठी हाव
त्याउलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सत्तेत राहून सुद्धा सत्तेची फळे चाखण्याची हाव जास्त दिसून आली. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून संपूर्ण पक्षावर कब्जा करण्याची पार्थ पवारांना घाई झाली. सुनेत्रा पवारांना कुठलाही अनुभव नसताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे अर्थमंत्री पद मिळविण्याची घाई झाली. एकीकडे भाजपच्या सत्तेची फळे चाखताना छगन भुजबळांना अचानक राष्ट्रवादीच्या स्वबळाची आठवण झाली. 288 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार उभे करण्याची सूचना त्यांना करावीशी वाटली. या सगळ्यात सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसवर सुनेत्रा पवारांची पकड घट्ट होणे सोडाच, उलट पकड ढिल्ली झाल्याची चिन्हे दिसली.
प्रादेशिक पक्ष सत्तेवर असोत किंवा विरोधात असोत, त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता पसरलेली दिसली. कारण त्यांच्या नेतृत्वांना राजकीय अस्तित्वाच मिटायची भीती वाटली.
National parties successful in shifting leadership, but regional parties facing a mess
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातल्या नदीजोड प्रकल्पांना मोदी सरकारची गती; जलजीवन मिशनच्या योजनेलाही नवसंजीवनी!!
- शिवकुमार यांना दिलेला शब्द खरा करून राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!
- केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!
- भाजपने दिलेली सत्तेची फळे चाखतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंड कडूच!!; देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत तीव्र पडसाद!!