वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची टीम बंगालमध्ये आहे. या टीमने आज जादवपूरचा दौरा केला. तेव्हा त्यांना ४० घरे गुंडांनी पूर्णपणे जमीनदोस्त केल्याचे दिसून आले. इतकेच काय मानवाधिकार टीमच्या सदस्यांवर देखील काही गुंडानी हल्ले केल्याचे टीमच्या सदस्यांनी सांगितले. National Human Rights Commission (NHRC) team that visited Jadavpur to investigate post-poll violence was attacked.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची टीम पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांचा दौरा करीत आहे. त्यांना ठिकठिकाणी हिंसाचारग्रस्त नागरिकांनी भेटून गाऱ्हाणी सांगितली. निवेदने दिली आहेत. या टीमने विविध शहरांमध्ये निर्वासितांच्या कँपमध्ये राहाव्या लागलेल्या नागरिकांचीही भेट घेतली असून तेथील स्थितीची पाहणी केली आहे. तेथील मूलभूत सुविधांची आणि आरोग्य व्यवस्थेची स्थिती भयानक असल्याचे निरीक्षण मानवाधिकार टीमने नोंदविले आहे.
राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी मानवाधिकार आयोगाचे सदस्य राजीव जैन यांना पत्र लिहून तारकेश्वरमधील हिंसाचाराच्या घटनांचा तपशील सादर केला आहे. राज्यात निवडणूकीनंतर कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तारकेश्वर परिसरातील नागरिकांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले आहेत. आजही अनेक नागरिक दहशतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे दासगुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे.