नाशिक : प्रयागराजच्या कुंभमेळा तब्बल 67 कोटी भाविकांच्या त्रिवेणी संगम स्नानाने गाजला. त्याला जागतिक कीर्ती लाभली. योगी आदित्यनाथ सरकारने उत्तम नियोजन करून प्रयागराज आणि उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलला. या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये 2027 – 28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत या दोन्ही शहरांचा आणि प्रामुख्याने गोदावरी नदीचा चेहरा मोहरा बदलण्याचा चंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बांधला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याची तयारी सरकारने कसून सुरू केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन बैठका घेतल्या, पण मराठी माध्यमांमध्ये मात्र वेगवेगळ्या आखाड्यांच्या संत – महंतांच्या वादाच्या बातम्या जास्ती आल्या. संत – महंत एकमेकांवरच तुटून पडल्याच्या बातम्या माध्यमांनी रंगवल्या. सरकार करत असलेल्या नियोजनाला मराठी माध्यमांनी कमी प्राधान्य दिले. त्याऐवजी नाशिक विरुद्ध त्र्यंबकेश्वर मोठा वाद असल्याचे चित्र उभे केले.
पण या वादाच्या पलीकडे जाऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन तीर्थस्थानांचा नेमका विकास कसा होणार??, गोदावरी स्वच्छ होऊन ती निर्मळपणे वाहत कशी राहणार??, याचे मोठे नियोजन फडणवीस सरकार काटेकोरपणे करत आहे. त्यासाठी नव्या टीम्स कामाला लावल्या आहेत. प्रयागराजचा कुंभमेळा जेवढा यशस्वी झाला, त्याहीपेक्षा त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा कुंभमेळा यशस्वी करण्याचे आव्हान फडणवीस सरकार पेलत आहे. कुंभमेळा कायदा, कुंभमेळा प्राधिकरण ते प्रत्यक्षात अंमलबजावणी या तीन स्तरांवर काटेकोर नियोजन सुरू केले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत साधू महंतांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गोदावरी नदी वाहती पाहीजे, गोदावरी जिथे बंदिस्त आहे तिथे, गोदावरी खुली करा. आमची निराशा करू नका, ज्या व्यावसायिकांचे स्थलांतर केले जाईल, त्यांचे पुनर्वसन केले जावे. आम्ही कुंभमेळ्यात शाही स्नान शहरापासून दूर करणार आहोत. कुशावर्त तीर्थक्षेत्रावर आम्ही जाणार नाही. प्रयागराज प्रमाणेच कुंभमेळ्याचे क्षेत्र मोठे करा. 60 किलोमीटरपर्यंत घाटावर स्नानाची व्यवस्था करा, अशा मागण्या साधूंनी गिरीश महाजन यांच्याकडे केल्या. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली.
– गिरीश महाजन म्हणाले :
– मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत गर्दी वाढणार आहे. आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुशावर्त तीर्थक्षेत्र छोटे आहे, तिथे एवढे साधू कसे स्नान करणार?? याची चिंता होती. मात्र आता मोठा निर्णय घेतला आहे. कुशावर्त तीर्थाच्या साधूंचे स्नान बाहेर करू, हा मोठा निर्णय घेतला. त्र्यंबकेश्वरला देशभरातून लाखो भाविक येतात. मात्र इथे गोदावरी कुठे आहे, पाणी कुठे आहे? हा प्रश्न पडतो. गोदावरी पवित्र असून ही येथे प्रदूषण आहे. नाशिकमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. गोदावरी पुनर्जीवित केली जाणार आहे. 12 महिने गोदावरी वाहील, अशी तयारी करू, यासाठी एखादा धरण बांधावे लागले तरी बांधू, अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे.
– कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार
मी कुंभमेळ्याच्या निमित्ताने बैठक घेत आहे. सर्व आखाड्याचे प्रमुख बैठकीत आहेत. प्रयागराजमधील गर्दी बघितल्यावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला 3 ते 4 पट अधिक गर्दी होईल. कुठे दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेत आहोत. मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. लाखो भाविक कुशावर्तमध्ये स्नान करण्यासाठी येतात. पण तिथली जागा खूप छोटी आहे. गर्दी बघता तिथे स्नान करणे शक्य नाही. साधूंचे स्नान करण्यासाठी कुशावर्त तीर्थासारखे पवित्र कुंड तयार करणार आहे. दीड वर्षात तिथे नवीन कुंड तयार केला जाणार आहे.
– गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास
– त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरीचे नाव आहे. पण, गोदावरी दिसत नाही. इथे 5 ते 6 कुंड आहेत, एखादे छोटे धरण बांधून गोदावरी नदी प्रवाहित राहण्यासाठी प्रयत्न करू. त्र्यंबकेश्वरमधून वाहणारी गोदावरी नदी सिमेंट काँक्रिटने बंदिस्त झाली आहे. त्यावरचे स्लॅब काढून टाकू. गोदावरी नदी खुली करू. त्र्यंबकेश्वर शहरातून गोदावरी नदी वाहात राहील.जे व्यावसायिकांची व्यवस्था करू. येत्या काही दिवसात कामाला सुरुवात करू.
– कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा? यावरून नाशिक आणि त्र्यंबकमधील साधू-संतांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर देखील गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही स्थान महत्त्वाचे आहेत. नाशिक – त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावांनी कुंभमेळ्याचे नामकरण करू.
– कुठलेही मोठे कार्य म्हटले की किरकोळ वाद होतच राहतात. अनेक जण अनेक तोंडांनी बोलत राहतात, पण त्या पलीकडे जाऊन ठामपणे उभे राहून सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने मोठ्या घटनांकडे पाहिले की त्याचा व्यापक पट खऱ्या अर्थाने तयार करता येतो. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे फडणवीस सरकार या दृष्टीनेच पाहत असल्याने या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा पूर्ण चेहरा मोहरा बदलायचा या इराद्याने सरकार खऱ्या अर्थाने कामाला लागले आहे.