विशेष प्रतिनिधी
नांदेड :Nanded राज्य सरकारने घोषित केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचा एक छदामही न मिळाल्यामुळे संतप्त एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने थेट तहसीलदारांची गाडी फोडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शेतकऱ्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.Nanded
यासंबंधीच्या माहितीनुसार, साईनाथ खानसोळे (34) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीत त्याच्या शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजचा आपल्याला फायदा होईल असा त्याचा अंदाज होता. पण आजतागायत त्याला या पॅकेज अंतर्गत कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे संताप अनावर होऊन त्यांनी आज मुदखेड तालुक्याचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची गाडी फोडली. ‘सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील अनुदानाचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना कुणीही वाली राहिला नाही’, अशी व्यथा शेतकऱ्याने यावेळी मांडली.Nanded
तहसीलच्या आवारात नेमके काय घडले?
शेतकरी साईनाथ खानसोळे हे आज आपली व्यथा घेऊन मुदखेड तहसील कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी अचानक ‘जय जवान जय शिवराय’ अशी नारेबाजी करत आपल्या हातातील फावड्याने तहसीलदारांची गाडी फोडली. या अनपेक्षित घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर झाल्या प्रकाराची पोलिसांना माहिती देऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले. सध्या पोलिसांनी शेतकऱ्याची ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा झाले -तहसीलदार
दुसरीकडे, तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्याला सरकारचे अनुदान मिळाल्याचा दावा केला आहे. साईनाथ खानसोळे यांच्या खात्यात यावर्षीचे अतिवृष्टीचे 6200 रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. त्यांना मागच्या वर्षीचेही अनुदान मिळाले होते, असे ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यानुसार पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
महाराष्ट्राचा नेपाळसुद्धा होऊ शकतो – रविकांत तुपकर
दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या घटनेवरून सरकारवर शेतकऱ्यांची थट्टा चालवल्याचा आरोप केला आहे. दिवाळी अंधारात गेली, मदतीच्या नावाखाली थट्टा केली. नांदेडमधील ही घटना शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक आहे. सरकारने त्यांच्या भावना समजून घ्यावी नसता महाराष्ट्राचा नेपाळसुद्धा होऊ शकतो, असे ते म्हणालेत.
नुसत्या घोषणा नाही थेट मदत करा – वर्षा गायकवाड
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे अतिवृष्टी नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीनंतरही मदत नाही, म्हणून निराश शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत. या घटनेनंतर तरी प्रशासन आणि सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. नुसत्या घोषणा नाही, तर मदत अपेक्षित आहे, असे त्या म्हणाल्यात.
Nanded Farmer Smashes Tehsildar’s Car Over Non-Receipt Of Heavy Rain Relief Package Money
महत्वाच्या बातम्या
- हवामान विभागाचा अंदाज; पावसाचा पुन्हा धुमाकूळ, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज, तर उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट
- अजितदादा म्हणाले, काम करू दर्जेदार; कार्यकर्त्यांनी नागपूर कार्यालयात उडविला लावणीचा बार!!
- दिल्ली मेट्रोशी तुलना करून न्यूयॉर्क मेट्रोची पोलखोल; सगळीकडे घाण, सांडपाणी आणि कचऱ्याने भरलेले डबे गोल!!
- US-China : अमेरिका-चीन ट्रेड डीलची फ्रेमवर्क फायनल; ट्रम्प-शी जिनपिंग भेटीपूर्वी निर्णय