विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारला राजकीय दृष्ट्या घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभांचा धडाका महाराष्ट्रात लावण्याचा निर्णय घेतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने एक छुपी चाल खेळली आहे. त्यांना महाविकास आघाडी तर टिकवून ठेवायची आहे, पण त्याच वेळी महाविकास आघाडीतला मध्यवर्ती पक्ष म्हणूनही स्थान बळकावून उद्धव ठाकरेंना त्या स्थानावरून बाजूला करायचे आहे. हीच त्यांची छुपी चाल काही सूचक राजकीय खेळ्यांमधून स्पष्ट झाली आहे.MVA meeting : NCP trying to dislodge Uddhav Thackeray from the central position in MVA skillfully
मूळात महाविकास आघाडीची बैठक विधिमंडळातल्या कुठल्या दालनात न घेता, ती यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेणे याचा अर्थच महाविकास आघाडीवर राष्ट्रवादीचे अघोषित वर्चस्व दाखविणे आहे. तशी या वर्चस्वाची सुरुवात महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच झाली होती हे खरे. पण त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा हा समोर ठेवावाच लागत होता आणि अखंड शिवसेनेचे मंत्री देखील काही महत्त्वाच्या खात्यांवर काम करत होते.
पण शिवसेनेच्या फुटी नंतर ती स्थिती उरलेली नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बैठकीत राष्ट्रवादीने जी चाल खेळली, ती नीट समजावून घेतली पाहिजे. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आसन माजी मुख्यमंत्री म्हणून निश्चितच मध्यभागी ठेवले होते हे खरे, पण स्टेजवर लावलेल्या फ्लेक्स मध्ये मात्र चतुराईने बदल करून राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह मध्यवर्ती ठिकाणी लावले होते आणि शिवसेना ठाकरे गटाचे चिन्ह मशाल याचे स्थान तिसऱ्या नंबर वर ठेवले होते.
ही जशी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची छुपी सूचक खेळी होती. तशीच आणखी एक सूचक खेळी अजितदादांच्या भाषणातून समोर आली आहे. महाविकास आघाडी जो एकत्रित सभांचा धडाका महाराष्ट्रात लावणार आहे, त्या सर्व सभांची सभानिहाय जबाबदारी निश्चित करताना अजितदादांनी पुण्याच्या सभेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे, तर मुंबईतल्या सभेची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली आहे. त्याच वेळी बाकीच्या नेत्यांकडेही जबाबदाऱ्या सोपवून अजित दादांनी सर्वात मोठ्या सभेला बक्षीस जाहीर केले आहे. असे बक्षीस जाहीर करून एक प्रकारे महाविकास आघाडी मधल्या घटक पक्षांमध्येच अजितदादांनी चतुराईने चुरस निर्माण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर कोणत्याही स्थितीत विशिष्ट मर्यादेपलिकडे वाढू शकत नाही. मतेही मिळवू शकत नाही. त्यामुळे विजयी जागांची संख्या 100 च्या वर नेऊ शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी टिकवणे हे राष्ट्रवादीसाठी अपरिहार्य तर आहेच, पण मग निदान रेटारेटी करून दुसऱ्या ऐवजी प्रथम क्रमांकावर येण्यासाठी काही छुप्या खेळ्यांचीही आवश्यकता आहे. हीच नेमकी छुपी खेळी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये सभा कोण मोठी घेतो?, अशी स्पर्धा लावून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केली आहे.
पण राष्ट्रवादीच्या बाबतीत हा नेहमीच प्रश्न तयार होतो, की त्या पक्षाला प्रत्येक वेळी अशा छुप्याच खेळ्या का कराव्या लागतात?? उघडपणे नावं जाहीर करून मैदानात उतरून मैदान का मारता येत नाही?? याचे उत्तर आजपर्यंत गुलदस्त्यात आहे. पण म्हणून उद्धव ठाकरेंना मध्यवर्ती स्थानावरून बाजूला करण्याच्या आणि स्वतः ती खुर्ची खेचून घेण्याच्या राष्ट्रवादीच्या या छुप्या खेळ्या जनतेपासून लपलेल्या नाहीत!!
MVA meeting : NCP trying to dislodge Uddhav Thackeray from the central position in MVA skillfully
महत्वाच्या बातम्या
- भारताच्या शत्रूची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन होणार क्षणात नष्ट; DRDO कडून S-400 सारख्या घातक शस्त्र प्रणालीची निर्मिती!
- भारत मित्र देश रशियाला करतोय मोलाची मदत! आयात पाच पटीने वाढली
- Surekha Yadav : मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी केलं ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे सारथ्य; ठरल्या आशियातील पहिल्या महिला ‘लोको पायलट’
- राज ठाकरेंना जाणता राजा प्रयोगाचे निमंत्रण; निमंत्रणातून भाजपची नवी खेळी